कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा भीषण अपघातात मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल

श्रावण राठोड यांचा अपघातात

मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

वाई : वाई-सातारा मार्गावरील वाकेश्वर-बावधन हद्दीत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) विभागातील कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड हे आपल्या पत्नीसह वाई-सातारा रस्त्यावरून प्रवास करत असताना वाकेश्वर-बावधन परिसरात पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, श्रावण राठोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

श्रावण राठोड हे वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागात कार्यरत होते. अत्यंत धाडसी, कर्तव्यदक्ष आणि गुन्ह्यांच्या तपासात विशेष प्राविण्य मिळवलेले अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे वाई पोलीस दलासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अपघातानंतर चालकासह वाहन घटनास्थळावरून फरार झाले असून, संबंधित अज्ञात वाहन आणि चालकाचा शोध घेण्यासाठी वाई पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत. अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments