सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत विक्रमी ९९.८९ टक्के मतदानानंतर ‘माण-खटाव’चा आमदार निश्चित..!

सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक

विक्रमी ९९.८९ टक्के 

मतदानानंतर

‘माण-खटाव’चा आमदार 

निश्चित..!

माण देशाचा वरिष्ठ सभागृहात डंका वाजणार!

संतोष शिराळे, सातारा : सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानाने ९९.८९ टक्क्यांचा अभूतपूर्व ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. एकूण ८९५ पैकी तब्बल ८९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, या द्विवार्षिक निवडणुकीत नवा आमदार सातारा जिल्ह्यातीलच आणि तोही 'माण-खटाव' (माण देश) तालुक्याचाच होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार हे खटाव-माण भागाशी संबंधित असल्याने 'माण देशाचा' लोकप्रतिनिधी विधान परिषदेत जाणार, यावर शिक्कामोर्तब झाले असून संपूर्ण माण देशात आनंदाचे वातावरण आहे.

सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक मतदारसंघात ९९.८९% मतदान झाले असून, शेवटच्या २ तासात १६४ मतदारांनी केलेल्या मतदानामुळे मतदानाचा टक्का थेट शिखरावर पोहोचला. महायुतीचे भाजप उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उमेदवार अभयसिंह जगताप या दोन्ही प्रमुख नेत्यांची नाळ सातारा जिल्ह्याशी, विशेषतः माण-खटाव (माण देश) भागाशी जोडलेली आहे. त्यामुळे निकाल कोणाच्याही बाजूने लागला, तरी आमदार माण-खटावचाच होणार हे निश्चित आहे. यापूर्वी सांगली जिल्ह्यालाच अनेक वेळा संधी मिळाली होती.

सातारा जिल्ह्यातील वाई, फलटण, दहिवडी, कोरेगाव, सातारा, पाटण व कराड  आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव, ईश्वरपूर, सांगली व जत अशा ११ केंद्रांवर १०० टक्के मतदान पार पडले. तर विटा केंद्रावर ९८.९७ टक्के मतदान झाले. माण आणि कोरेगाव-खटाव केंद्रांवर दुपारपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. पाटण आणि जत तालुक्यात दुपारी २ वाजताच १००% मतदान पूर्ण झाले होते.

या निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस व शरद पवार गटाने आपापली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पक्षादेश (व्हिप) लागू नसलेल्या या निवडणुकीत स्थानिक समीकरणांना मोठे महत्त्व आले होते. सांगली आणि सातारच्या राजकीय गणितांमध्ये यंदा माण-खटाव तालुक्याला केंद्रस्थान मिळाल्यामुळे, 'माण देशाचा' आवाज आता राज्याच्या वरिष्ठ सभागृहात गुंजणार आहे. विजयी उमेदवाराचे नाव २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर अधिकृतपणे जाहीर होईल, मात्र आमदार सातारा-माणचाच होणार यावर आजच मतपेटीतून शिक्कामोर्तब झाले आहे.

Post a Comment

0 Comments