सातारा - सांगली
विधान परिषदेसाठी
भाजपच्या नेत्यांची
सत्त्वपरीक्षा?
धैर्यशील कदमांसाठी संधी की राजकीय कसोटी!
जगताप यांचे "स्वाभिमानाच्या लढाईत सत्ताधारी महायुतीला थेट आव्हान
संतोष शिराळे, सातारा : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापवले आहे. भाजपने धैर्यशील कदम यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली असली तरी या निर्णयानंतर पक्षातील नाराजी, आघाडी धर्म, जुने वाद आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वर्षानुवर्षे पक्षासाठी खळीनं पोस्टर चिकटवणारे, संघर्षाच्या काळात भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरणारे कार्यकर्ते आणि विधान परिषदेची अपेक्षा असलेले शेखर गोरे, सुनीलतात्या काटकर यांच्यासारखे इच्छुक बाजूला पडले. त्याचवेळी धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात असंतोष व्यक्त होत आहे. भाजप नेतृत्वासाठी ही निवडणूक केवळ विजयाची नाही, तर नाराजी व्यवस्थापनाचीही परीक्षा ठरत आहे. कारण अनेक कार्यकर्त्यांच्या मनात एकच प्रश्न आहे – पक्ष संकटात असला की आघाडी धर्म आठवतो, पण पद वाटपाच्या वेळी निष्ठावंतांना का विसरले जाते?
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून निर्माण झालेले राजकीय वादळ अजून पूर्णपणे शांत झालेले नाही. खासदार उदयनराजे भोसले हे भावनिक नेतृत्व म्हणून ओळखले जात असले तरी त्या काळातील नाराजीचे पडसाद अजूनही कार्यकर्त्यांमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षातील सर्व गट या निवडणुकीत मनापासून सक्रिय राहतील का, हा मोठा प्रश्न आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीदरम्यान घडलेल्या सत्तानाट्याची जखमही अद्याप भरलेली नसल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात. पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील राजकीय समीकरणे, त्यावेळची भूमिका आणि त्याचे परिणाम यांची चर्चा आजही सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडी धर्माचा दाखला देणारे नेते आता कोणती भूमिका घेतात, याकडेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांचे लक्ष लागले आहे.
धैर्यशील कदमांना कामाचे फळ!
धैर्यशील कदम यांची उमेदवारी हा सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी सातारा-सांगलीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संपर्क वाढवला, संघटनात्मक काम केले आणि पक्ष विस्तारासाठी प्रयत्न केले हे वास्तव आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या मते त्यांना मिळालेली उमेदवारी ही त्यांच्या मेहनतीची पोचपावती आहे. मात्र विरोधक आणि काही नाराज भाजप कार्यकर्त्यांचा युक्तिवाद वेगळा आहे. सातारा-सांगलीतील कठीण राजकीय गणित, महाविकास आघाडीची एकजूट आणि स्थानिक पातळीवरील असंतोष पाहता पक्षाने कदम यांना विजयाची संधी दिली की पराभवाची जोखीम त्यांच्या खांद्यावर टाकली, याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे ही निवडणूक धैर्यशील कदम यांच्या राजकीय भविष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.
अभयसिंह जगतापांची एंट्री; निवडणुकीत वाढली रंगत
महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीने निवडणुकीचे स्वरूपच बदलून टाकले आहे. आयटी उद्योजक, युवा नेतृत्व आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मजबूत संपर्क या जोरावर त्यांनी निवडणुकीत आक्रमक भूमिका घेतली आहे. जगताप यांनी ही निवडणूक केवळ राजकीय नसून "स्वाभिमानाची लढाई" असल्याचे सांगत महायुती सरकारला थेट आव्हान दिले आहे. त्यांच्या मते स्थानिक स्वराज्य संस्थांतील अनेक सदस्यांमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी असून ती मतदानातून दिसून येईल.
"गद्दारी झाली तर ती भाजपकडेच होईल"
जगताप यांचे "गद्दारी झाली तर ती भाजपकडेच होईल. आमच्याकडे कट्टर पक्षनिष्ठ लोक आहेत," हे वक्तव्य निवडणुकीतील सर्वात चर्चित विधान ठरले आहे. या वक्तव्यातून त्यांनी भाजपमधील नाराज इच्छुक, स्थानिक पातळीवरील मतभेद आणि अंतर्गत अस्वस्थतेवर अप्रत्यक्ष बोट ठेवले आहे. महाविकास आघाडीमध्ये तुलनेने एकजूट असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांच्या गोटात अस्वस्थता असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.
५०० मतांचे लक्ष्य!
जगताप यांनी सुमारे ५०० मते खेचून आणण्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडीच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अपक्ष गट आणि स्थानिक पातळीवरील वैयक्तिक संबंध यांच्या आधारे हा दावा केला जात असल्याचे बोलले जाते. मात्र निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात होणारे राजकीय संपर्क, गुप्त मतदानाचे स्वरूप आणि स्थानिक समीकरणे यामुळे प्रत्यक्ष निकालापर्यंत कोणालाही विजय निश्चित मानता येणार नाही.
खरी लढाई मतांची नाही, मनांची
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत आजच्या घडीला सर्वात मोठा मुद्दा विरोधकांचा नाही, तर भाजपसमोरील अंतर्गत नाराजीचा आहे. नाराज इच्छुकांना समजावणे, जुन्या वादांवर पडदा टाकणे, आघाडी धर्माबाबतच्या प्रश्नांना उत्तरे देणे आणि सर्व गटांना एकत्र ठेवणे ही भाजप नेतृत्वापुढील मोठी कसोटी आहे. दुसरीकडे अभयसिंह जगताप यांनी आक्रमक प्रचार, स्वाभिमानाची भूमिका आणि सत्ताधाऱ्यांविरोधातील भावना यांचा आधार घेत निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.
घोडेबाजाराची चर्चा की पक्षनिष्ठेची परीक्षा?
सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारांची संख्या मर्यादित असल्याने प्रत्येक मताला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा निवडणुकांमध्ये उमेदवारांपेक्षा स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे, वैयक्तिक संबंध, गटबाजी आणि शेवटच्या क्षणी होणाऱ्या हालचाली निर्णायक ठरत असतात. त्यामुळे मतदान जवळ येत असताना घोडेबाजाराच्या चर्चांनाही उधाण आले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी भाजपमधील नाराजीचा मुद्दा सातत्याने पुढे आणला असून त्याचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या पाठीशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि पक्ष संघटना उभी असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. मात्र निवडणुकीचा खरा प्रश्न हा आहे की भाजप आपल्या नाराज गटांना कितपत एकत्र ठेवू शकतो? शेखर गोरे, सुनीलतात्या काटकर यांच्यासारख्या इच्छुकांच्या समर्थकांमधील नाराजी पूर्णपणे दूर झाली आहे का? लोकसभा उमेदवारीपासून जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकांपर्यंत निर्माण झालेली राजकीय कटुता विसरून सर्व गट एकदिलाने काम करतील का? याची उत्तरे मतदानाच्या दिवशी मिळणार आहेत.
राजकीय जाणकारांच्या मते,
संख्याबळाच्या आधारावर महायुती अद्याप आघाडीवर असल्याचे चित्र दिसत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केवळ आकडे निर्णायक ठरत नाहीत. नाराजी, क्रॉस व्होटिंग, अपक्षांची भूमिका आणि शेवटच्या टप्प्यातील राजकीय व्यवस्थापन हे घटक निकालाला कलाटणी देऊ शकतात. याच कारणामुळे भाजप आघाडीवर असल्याचा दावा करत असली तरी विजयाचा मार्ग तितकासा सोपा नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने ही निवडणूक स्वाभिमानाची लढाई म्हणून रंगवून वातावरण तापवले आहे.
सध्या तरी कागदावरील गणित महायुतीच्या बाजूने झुकलेले दिसत असले, तरी मतपेटी उघडेपर्यंत कोणतीही बाजू निश्चित नाही. त्यामुळे सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक ही मतांच्या संख्येपेक्षा राजकीय व्यवस्थापन, पक्षनिष्ठा आणि नेतृत्वाच्या प्रभावाची खरी परीक्षा ठरणार आहे. घोडेबाजाराच्या चर्चांना किती वाव मिळतो आणि पक्षनिष्ठा किती टिकते, यावरच या निवडणुकीचा अंतिम निकाल अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक ही आता केवळ एका जागेची निवडणूक राहिलेली नाही; ती भाजपच्या संघटनशक्तीची, महाविकास आघाडीच्या एकजुटीची आणि पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांची निर्णायक चाचणी ठरत आहे.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!