५.४० लाखांचे २७ गहाळ मोबाईल
शोधून मालकांना केले परत
वाई पोलिसांची दमदार कामगिरी
वाई : वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रासह इतर राज्यांतून गहाळ व चोरीस गेलेले एकूण २७ मोबाईल फोन शोधून काढले. सुमारे ५ लाख ४० हजार रुपये किमतीचे हे मोबाईल पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले.
वाई शहरातील वाढत्या मोबाईल गहाळ होण्याच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी वाई पोलीस ठाण्याला अधिकाधिक मोबाईल शोधून नागरिकांना परत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज आणि पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिंदे यांना आवश्यक मार्गदर्शन करून तातडीने कारवाईचे आदेश दिले.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने महाराष्ट्रातील विविध भागांसह इतर राज्यांमधूनही या मोबाईलचा शोध घेत त्यांची यशस्वीपणे पुनर्प्राप्ती केली. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी समाधान आणि प्रशंसनीय भावना व्यक्त होत आहेत. वाई हे सातारा जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने परिसरातील हजारो नागरिक रोजगार, शिक्षण व खरेदीसाठी शहरात ये-जा करतात. या गर्दीमुळे प्रवासादरम्यान किंवा बाजारपेठेत मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत वाई पोलिसांनी केलेली ही कारवाई विशेष महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे, जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने विविध कंपन्यांचे एकूण ३५७ गहाळ मोबाईल शोधून संबंधित तक्रारदारांना परत केले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिंदे, हेमंत शिंदे, नितीन कदम आणि श्रावण राठोड यांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अभिनंदन केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!