कराड तालुक्यातील शहापूरचा सुपुत्र अर्जुन जाधव यांना काश्मीरमध्ये वीरमरण



कराड तालुक्यातील

शहापूरचा सुपुत्र अर्जुन जाधव

यांना काश्मीरमध्ये वीरमरण

२५ जूनला मुलाच्या पहिल्या वाढदिवसासाठी येणार होते गावी 

त्याआधीच काश्मीरमधून आली वीरमरणाची दुर्दैवी बातमी

कराड : कराड तालुक्यातील शहापूर येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांना जम्मू-काश्मीर येथे देशसेवेचे पवित्र कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र सज्ज असलेल्या या वीर जवानाच्या निधनाने शहापूर गावासह कराड तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विशेष म्हणजे, २५ जून रोजी त्यांच्या चिमुकल्या मुलाचा पहिला वाढदिवस असल्याने अर्जुन जाधव हे १५ जूनला सुट्टी घेऊन गावी येणार होते. मुलाच्या वाढदिवसाच्या आनंदासाठी कुटुंबीय आतुरतेने वाट पाहत असतानाच त्यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी आल्याने जाधव कुटुंबियांवर दुःखाचा आघात झाला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सेवा बजावत असताना झालेल्या अपघातात त्यांना वीरमरण आले. देशसेवेसाठी स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या या शूर जवानाचे बलिदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शाहापूर गावासह संपूर्ण कराड तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी सायली जाधव, ११ महिन्यांचा मुलगा सर्वेश, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या एका बंधूंकडूनही देशसेवेची परंपरा पुढे सुरू असून ते सध्या भारतीय नौदलात कार्यरत आहेत.

"शहापूर (ता. कराड) येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांना काश्मीर येथे सेवा बजावत असताना वीरगती मिळाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. जाधव कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत," अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि जाधव कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच सर्वत्र प्रार्थना व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments