"...तर त्यांनी या निवडणुकीत राग व्यक्त करावा आणि जगताप यांच्या मागे उभे राहावे" : जयंत पाटील यांचा सूचक संदेश

...तर त्यांनी या निवडणुकीत

राग व्यक्त करावा आणि

जगताप यांच्या मागे उभे राहावे

ज्येष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सूचक संदेश

सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक 

संतोष शिराळे सातारा : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे ज्येष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीतील अंतर्गत नाराजीवर अप्रत्यक्ष भाष्य करत, नाराज गटांनी मतदानातून आपली भूमिका स्पष्ट करावी, असा सूचक संदेश दिला.

अभयसिंह जगताप हे सक्षम, सुशिक्षित आणि नव्या पिढीचे नेतृत्व करणारे उमेदवार असल्याचे सांगत जयंत पाटील यांनी सातारा-सांगली मतदारसंघात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असल्याचा दावा केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांकडून मिळणारा प्रतिसाद निकालातही दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी, "मंत्रीपदाच्या काही मर्यादांमुळे अनेकांना उघडपणे बोलता येत नाही. मात्र त्यांच्या समर्थकांनी आपला स्वाभिमान आणि भावना जपत मतदानातून भूमिका स्पष्ट करावी," असे सांगितले. या वक्तव्यामुळे महायुतीतील काही नाराज गटांना उद्देशून त्यांनी अप्रत्यक्ष संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

यावेळी जयंत पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा थेट उल्लेख टाळला. मात्र, त्यांच्या समर्थकांनी सध्याच्या परिस्थितीचे भान ठेवून निर्णय घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी स्थानिक राजकारणातील समीकरणांचा या निवडणुकीवर प्रभाव पडणार असल्याचे सूचित केले.

महाविकास आघाडी ही मनी पॉवर किंवा मसल पॉवरच्या जोरावर निवडणूक लढवणारी आघाडी नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी, विकासाचे मुद्दे, लोकशाही मूल्ये आणि जनविश्वासाच्या बळावरच ही निवडणूक लढवली जात असल्याचे सांगितले.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या वक्तव्यातून महायुतीतील अंतर्गत अस्वस्थतेवर बोट ठेवण्याचा प्रयत्न दिसून आला असून, मतदानाच्या दिवशी काही नाराज मतदार प्रतिनिधी वेगळी भूमिका घेतात का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत केवळ अधिकृत आकडेवारीच नव्हे, तर पडद्यामागील राजकीय समीकरणेही निर्णायक ठरणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Post a Comment

0 Comments