जावली पंचायत समितीचे माजी
उपसभापती शंकरराव साळुंखे
(आण्णा) यांचे निधन
सच्चा कार्यकर्ता, कोयनेचा निष्ठावंत सुपुत्र हरपला
सातारा, प्रतिनिधी : जावली पंचायत समितीचे माजी उपसभापती, जावली सहकारी बँकेचे माजी संचालक, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे माजी अध्यक्ष तथा केळघर तर्फे सोळशी येथील ज्येष्ठ समाजसेवक स्व. शंकरराव सीताराम साळुंखे (आण्णा) यांचे मंगळवारी (दि. ९) सकाळी ७ वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने कोयना विभागातील राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील एक निष्ठावंत, संयमी व सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. माजी आमदार स्व. जी. जी. कदम (आण्णा) यांच्या सहवासातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. १९८५ मध्ये ग्रुप ग्रामपंचायत केळघर-सोळशीचे सरपंच म्हणून त्यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळली. त्यानंतर तेटली ग्रामपंचायतीचेही पहिले सरपंच होण्याचा मान त्यांना मिळाला. १९९६ मध्ये जावली पंचायत समितीवर निवडून आल्यानंतर त्यांची उपसभापतीपदी निवड झाली.
सन २००२ पासून सलग दहा वर्षे जावली सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या सोमजाई काळेश्वरी, आपटी विकास व पंचशील विकास सेवा सोसायटी उचाट या संस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तसेच जयभवानी केळघर तर्फे सोळशी आणि भैरवनाथ नऊ गाव विकास सेवा सोसायटीच्या स्थापनेतही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. १९९५-९६ दरम्यान तत्कालीन आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून सातारा-तेटली-गोगवे या एसटी मार्गाच्या सुरुवातीसाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केले. वारकरी संप्रदायाचे अनुयायी असलेल्या आण्णांच्या गळ्यात कायम तुळशीची माळ असायची. साधी राहणी, प्रेमळ स्वभाव, शांत वृत्ती आणि सर्वांशी आदराने वागण्याची त्यांची शैली यामुळे ते सर्व स्तरांतील लोकांना आपलेसे वाटत होते.
माजी आमदार स्व. जी. जी. कदम, आमदार शशिकांत शिंदे यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासोबतही त्यांनी प्रामाणिकपणे कार्य केले होते. राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात निस्वार्थी भावनेने जनतेची सेवा करणारा एक सच्चा कार्यकर्ता, कोयना विभागाचा निष्ठावंत सुपुत्र आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला असून, त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्व. शंकरराव साळुंखे (आण्णा) यांच्यावर आज मंगळवार (दि. ९) रोजी सायंकाळी ४ वाजता त्यांच्या जन्मगावी केळघर तर्फे सोळशी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्व. शंकरराव साळुंखे (आण्णा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!