अमेरिकन नागरिकांची
ऑनलाईन फसवणूक
प्रकरणी मुख्य सूत्रधारास
नाशिक येथून अटक
सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांची धाडसी कारवाई
सातारा : सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अमेरिकन नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरविरोधात कारवाई करत टोळीच्या मुख्य सूत्रधारासह २२ आरोपींना अटक केली आहे. बिपिन रामतीर्थ गुप्ता उर्फ बिपिन साहू (वय ३५, रा. गोविंदनगर, नाशिक) असे मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यातील बोगस कॉल सेंटरवर लक्ष ठेवून डिजिटल अरेस्ट व ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान, दि. २२ मे २०२६ रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कोरेगाव-रहिमतपूर रोडवरील सुभाषनगर येथील रिलायबल अपार्टमेंटमध्ये “श्रीसाई लॉजिस्टीक्स अँड कन्सल्टन्स एलएलपी” या नावाने बोगस कॉल सेंटर सुरू असून, तेथून अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात आहे.
या माहितीच्या आधारे दि. २३ मे २०२६ रोजी मध्यरात्री छापा टाकण्यात आला. यावेळी १७ पुरुष व ४ महिला अमेरिकन नागरिकांशी ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांना “अॅमेझॉनवरून वस्तू ऑर्डर केली आहे” असे सांगून भीती दाखवत असल्याचे उघड झाले. संबंधित व्यक्तींनी ऑर्डर नाकारल्यास त्यांना डिजिटल अरेस्टची धमकी देऊन गिफ्ट व्हाऊचरच्या माध्यमातून डॉलर स्वरूपात पैसे उकळले जात होते.
या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), ६१(१), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क), ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आज या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बिपिन रामतीर्थ गुप्ता उर्फ बिपिन साहू (वय ३५, रा. गोविंदनगर, नाशिक) यास नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
या कारवाईत कॉल सेंटरचा मालक सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी याच्यासह एकूण १७ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून संगणक साहित्य, मोबाईल फोन व ऑनलाईन व्यवहारासाठी वापरले जाणारे तांत्रिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर फसवणूक उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!