दरडप्रवण व पूरप्रवण भागातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण : जावळीचे तहसीलदार प्रविण मुदगूल यांची माहिती


दरडप्रवण व पूरप्रवण भागातील

नागरिकांना आपत्ती

व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

जावळी तालुक्यात २ व ३ जून रोजी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन

जावळीचे तहसीलदार प्रवीण मुदगूल यांची माहिती

मेढा : सातारा जिल्ह्यातील दरडप्रवण व पुरप्रवण भागातील नागरिक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण व जनजागृती करण्यासाठी जावळी तहसील कार्यालयामार्फत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे, अशी माहिती जावळीचे तहसीलदार प्रविण मुदगूल यांनी दिली. 

मुदगूल यांनी सांगितले, की संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण व्हावे, आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळातील उपाययोजना आणि आपत्तीनंतरची कार्यपद्धती याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्याचा उद्देश या प्रशिक्षणामागे आहे. तसेच प्रथमोपचार, शोध व बचाव कार्य, आपत्ती व्यवस्थापन साहित्याचा वापर, नागरिकांनी काय करावे व काय करू नये याबाबत सखोल माहिती दिली जाणार आहे.

हे प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन केंद्र, यशदा पुणे येथील मास्टर ट्रेनरमार्फत घेण्यात येणार असून, गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मंडलाधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषिसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, वनपाल, आपदा मित्र, युवक मंडळ सदस्य, उत्कृष्ट पोहणारे युवक, रेस्क्यू टीम व ट्रेकर्स यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जावळीचे प्रविण मुदगूल यांनी केले आहे.

दि. दोन रोजी केळघर, तर तीन रोजी पंचायत समितीत प्रशिक्षण

दिनांक २ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता मौजे केळघर येथील मैत्री पार्क अपार्टमेंटवरील हॉल येथे तर दिनांक ३ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती जावळी येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे तहसीलदार प्रवीण मुदगुल यांनी सांगितले आहे. 

Post a Comment

0 Comments