वाठार स्टेशन येथे रस्त्यावर
भरधाव चारचाकी वाहनाची
२१ वर्षीय युवकाला धडक
वेळेत ॲम्बुलन्स न मिळाल्याने युवकाचा मृत्यू
ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; संतप्त नागरिकांचे आंदोलन
वाठार स्टेशन : वाठार स्टेशन परिसरात भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत एका 21 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, वेळेत ॲम्बुलन्स न मिळाल्यामुळे युवकाला जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाला भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर तो गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडून होता. अपघातानंतर नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने ॲम्बुलन्स सेवेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार फोन करूनही वेळेत कोणतीही ॲम्बुलन्स घटनास्थळी पोहोचली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
युवकाची प्रकृती गंभीर होत चालल्याने अखेर नातेवाईकांनी स्वतःच्या पिकअप वाहनातून त्याला सातारा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे युवकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.
घटनेनंतर संतप्त नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत आंदोलनाचा इशारा दिला. “वेळेत ॲम्बुलन्स मिळाली असती तर युवकाचा जीव वाचला असता,” अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी आरोग्य यंत्रणा आणि संबंधित प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला.
तसेच सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारचे सुरक्षा उपाय करण्यात आले नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावर आवश्यक दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, बॅरिकेट्स किंवा इशारे नसल्याने अपघातांची शक्यता वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या प्रकरणात संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी नागरिकांनी वाठार स्टेशन परिसरात कायमस्वरूपी ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून द्यावी, अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. “एका निष्पाप युवकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. या घटनेने संपूर्ण वाठार स्टेशन परिसर हादरला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.





0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!