अमेरिकन नागरिकांची
ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या
आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
कोरेगावमधील बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त; १७ आरोपी व ४ महिलांना अटक
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या सूचनेनुसार सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह कोरेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
सातारा : अमेरिकन नागरिकांशी ऑनलाईन संपर्क साधून त्यांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा सातारा पथकाला मोठे यश आले आहे. कोरेगाव-रहिमतपूर रोडवरील सुभाषनगर येथील रिलायबल अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून १७ आरोपी व ४ महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर यांनी नागरिकांची डिजिटल अरेस्टद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.
दिनांक २२ मे २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी हा कोरेगाव-रहिमतपूर रोडवरील रिलायबल अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर “श्रीसाई लॉजिस्टीक्स अँड कन्सल्टंस एलएलपी” या नावाने बोगस कॉल सेंटर चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर २३ मे रोजी मध्यरात्री १२.५५ वाजता छापा टाकण्यात आला.
या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना फोन करून, “तुम्ही अमेझॉनवरून वस्तू ऑर्डर केली असून त्याचे पैसे भरावे लागतील,” अशी भीती दाखवली जात होती. संबंधित नागरिकांनी ऑर्डर दिलेली नसल्याचे सांगितल्यास त्यांच्या मोबाईलवर बनावट मेसेज व बनावट ऑर्डर क्रमांक पाठवून गिफ्ट व्हाऊचरच्या माध्यमातून डॉलरमध्ये पैसे मागवले जात होते. पैसे देण्यास नकार दिल्यास “डिजिटल अरेस्ट” करण्याची धमकी दिली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८३/२०२६ भा.न्या.सं. कलम ३१६(२), ३१८(४), ६१(१), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क), ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाई सातारा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव उपविभाग राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, कोरेगाव पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, शिवाजी गुरव, विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, शरद बेबले, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमोल माने, लैलेश फडतरे, जयवंत खांडके, हसन तडवी, अमित झेंडे, संदिप पाटील, राजू कांबळे, अरुण पाटील, स्वप्नील शिंदे, प्रविण कांबळे, अमित सपकाळ, अमित माने, अविनाश चव्हाण, अजित कर्णे, मुनीर मुल्ला, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, महेश निर्मळ,संकेत निकम, धीरज महाडीक, रोहित निकम, सचिन ससाणे, स्वप्निल दौंड, मपोहवा शकुंतला सणस, अधिका वीर यांनी सहभाग घेतला आहे.
अटक आरोपींची नावे अशी, १) सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी (कॉल सेंटर मालक), २) विरेंद्र विनोद बोडरे, ३) अक्षय रामचंद्र भंडारी, ४) गुरुप्रसाद प्रताप राणे, ५) मनीष दिनेश जोशी, ६) शमशुद्दीन सफाट सय्यद, ७) गौरव भानुदास लांडगे, ८) अभिषेक संजय गुप्ता, ९) इशांत संजय खांडेकर, १०) रितेश चंद्रेश चौहान, ११) बाबू व्यंकटेश चलवादी, १२) अवि अजय वानखेडे, १३) दिपक सुनिल खंडारे, १४) मोहंमद शफिक सलीम कोकणे, १५) ओमकार संजय घार्गे, १६) दिपेन विवेक जाधव, १७) लेबीन लारसन सायमन.
दरम्यान, सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.





0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!