स्कॉर्पिओ १२०० फूट
खोल दरीत कोसळून
आठ तरुणांचा मृत्यू
आंबेनळी घाटात घडला भीषण अपघात
महाबळेश्वर : निसर्गाच्या कुशीत वसलेला आणि पर्यटकांना मोहिनी घालणारा आंबेनळी घाट रविवारी पहाटे मृत्यूच्या दरीत बदलला. महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील या धोकादायक घाटात सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांना घेऊन जाणारी स्कॉर्पिओ तब्बल ८०० फूट खोल दरीत कोसळली आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या भीषण दुर्घटनेने प्रत्येकाचे काळीज पिळवटून निघाले असून, दरीत सुरू असलेली मृतदेह बाहेर काढण्याची थरारक मोहीम अंगावर काटा आणणारी ठरत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व तरुण पर्यटनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे येथे गेले होते. शनिवारची रात्र आनंदात घालवल्यानंतर ते रविवारी पहाटे साताऱ्याकडे परत निघाले. पहाटे दोन वाजेपर्यंत त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होता; मात्र त्यानंतर अचानक सर्वांचे मोबाईल बंद झाले. वेळ उलटत गेली, पण मुलं घरी पोहोचली नाहीत. चिंताग्रस्त नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि त्यानंतर सुरू झाला एक हृदय पिळवटून टाकणारा शोध.
मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यानंतर पोलिसांना शेवटचे लोकेशन आंबेनळी घाटात मिळाले. प्रशासन घटनास्थळी पोहोचले तेव्हा कुंभरोशीजवळील घाटात सुरक्षा कठडे तुटलेले दिसले आणि खाली डोकावून पाहताच काळजाचा थरकाप उडाला. स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली होती. खाली फक्त दाट जंगल, काळोख आणि मृत्यूची शांतता होती.
शनिवारी रात्रीपासूनच ‘प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम’, ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’ आणि ‘सह्याद्री ट्रेकर्स’च्या जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बचावकार्य सुरू केले. दोरखंडांच्या सहाय्याने ते शेकडो फूट खोल दरीत उतरले. दरीतील निसरडे कडे, अंधार, दाट झाडी आणि सतत घसरणारे दगड यामुळे प्रत्येक क्षण जीवघेणा ठरत होता. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले; मात्र उर्वरित सहा मृतदेह दरीच्या आणखी खोल भागात अडकले असल्याने मोहिम अधिक कठीण बनली आहे.
अपघाताची भीषणता एवढी मोठी आहे की, ज्या ठिकाणी वाहन अडकले आहे तिथे घाटातून थेट खाली उतरणे जवळपास अशक्य झाले आहे. त्यामुळे आता बचाव पथकांनी नवी रणनीती आखली आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सचे प्रमुख सुनील बाबा भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्री नदीपात्राच्या दिशेने दरीच्या तळाशी पोहोचून दाभिळ गावाच्या बाजूने मृतदेह बाहेर काढण्याची धाडसी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. खडकाळ रचना, खोल दरी आणि घनदाट जंगलामुळे ही मोहीम अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे.
या दुर्घटनेत आसगाव येथील रितेश राजेंद्र लोखंडे, सुहास जितेंद्र लोखंडे, महेश अनिल पवार, आदित्य अशोक साळुंखे, मर्ढे येथील करण आनंद शिंगटे, निखिल अभिमन्यू शिंगटे, खटाव येथील वाहन चालक संदीप अशोक काटकर आणि चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील अंश समीर चव्हाण यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून अधिकृत ओळख प्रक्रिया सुरू आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, तहसीलदार कपिल घोरपडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण बचावकार्यावर लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, आंबेनळी घाटातील या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या दुर्घटनेमुळे साताऱ्यातील अनेक गावांमध्ये शोककळा पसरली असून, प्रत्येकाच्या ओठांवर एकच प्रश्न आहे — पर्यटनासाठी आनंदाने गेलेले हे आठ मित्र मृत्यूच्या दरीत कसे हरवले...?








0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!