सातारा ही संस्कृती आणि अभिरुचीची राजधानी : निखिल पिंगळे


सातारा ही संस्कृती आणि

अभिरुचीची राजधानी :

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे

तुषार भद्रे यांच्या आवाज जोपासना कार्यशाळेचा शानदार समारोप

सातारा : अजिंक्यताऱ्याच्या साक्षीने उभी असलेली सातारा नगरी ही केवळ इतिहासाची भूमी नसून कला, साहित्य, संस्कृती आणि अभिरुचीची समृद्ध परंपरा जपणारी नगरी आहे. महानगरांच्या तुलनेत साताऱ्यासारख्या शहरात सांस्कृतिक आणि कलाविषयक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जातात, ही कौतुकास्पद बाब असून अशा उपक्रमांसाठी परिश्रम घेणाऱ्या हातांचा मला अभिमान वाटतो. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रधर्म आणि संस्कृती साताऱ्यात जपली गेली आहे, असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी काढले.

साप्ताहिक भूमिशिल्प आणि दास्तान कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने भूमिशिल्प स्टुडिओ येथे आयोजित ‘भाषण, संभाषण व आवाज जोपासना’ या दहा दिवसीय कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, ज्येष्ठ रंगकर्मी, पत्रकार व आवाज प्रशिक्षक तुषार भद्रे, भूमिशिल्पचे संपादक पद्माकर सोळवंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पिंगळे म्हणाले, पुणे शहरात क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत असताना झोपडपट्टी भागात जाण्याचा अनेकदा अनुभव आला. आर्थिक मर्यादा असतानाही तेथील नागरिक सण-उत्सव आणि सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवताना दिसतात. बैल नसतानाही बैलपोळा साजरा होतो, कोजागिरीनिमित्त दुधाचे वाटप होते, तर दिवाळीत लहान मुले किल्ले उभारून संस्कृतीशी नाते जपत असल्याचे चित्र दिसते. याउलट मोठ्या शहरांतील टोलेजंग इमारतींमध्ये सांस्कृतिक अभिरुची जपण्याला फारसे प्राधान्य दिले जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, महानगरांमध्ये प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर वेळ आणि ऊर्जा खर्ची पडते; मात्र साताऱ्यात हस्ताक्षर सुधारण्यापासून ते प्रभावी वक्तृत्व विकसित करण्यापर्यंत विविध कौशल्यविकास उपक्रम सहज उपलब्ध आहेत. तुषार भद्रे यांच्यासारखे अनुभवी कलावंत कला आणि संस्कृतीच्या जतनासाठी मोलाचे योगदान देत आहेत. अशी व्यक्तिमत्त्वे समाजाने जपली पाहिजेत. या पार्श्वभूमीवर साताऱ्याला ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही.

उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी संवादकौशल्य आणि आवाज जोपासनेच्या महत्त्वावर भाष्य करताना प्रभावी बोलणे हे केवळ शब्दांवर नव्हे, तर आवाजाच्या चढ-उतारांवर आणि सादरीकरणावर अवलंबून असते, असे सांगितले. बोलणे प्रवाही आणि आशयपूर्ण असेल, तरच ते परिणामकारक ठरते. आवाजाचे योग्य संगोपन आणि सादरीकरण कौशल्य विकसित केल्यास या क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकतात. अनेकदा व्यक्तीची आवड आणि व्यवसाय यामध्ये अंतर असते; मात्र छंद आणि आवड हाच व्यवसायाचा भाग झाला, तर यश अधिक सहजतेने मिळते, असे त्या म्हणाल्या.

तुषार भद्रे यांच्यासारख्या अनुभवी रंगकर्मी, पत्रकार आणि व्याख्यात्यांच्या मार्गदर्शनाचा प्रशिक्षणार्थींना भविष्यात निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करत राजमाने यांनी भूमिशिल्पतर्फे आयोजित ही कार्यशाळा पुढील अनेक उपक्रमांसाठी दिशादर्शक ठरेल, असे मत व्यक्त केले.

समारोपप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी, पत्रकार व व्हॉईस कोच तुषार भद्रे यांनी आपल्या कलाक्षेत्रातील प्रवासाचा आणि कार्यशाळेदरम्यान दिलेल्या मार्गदर्शनाचा आढावा घेतला. संवाद, सादरीकरण, उच्चार, आवाजातील स्पष्टता आणि वक्तृत्वातील आत्मविश्वास या बाबींवर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

भूमिशिल्पचे संपादक पद्माकर सोळवंडे यांनी प्रस्ताविकात बोलताना साताऱ्यात भाषणकला, संवादकौशल्य आणि आवाज जोपासनेसाठी दर्जेदार प्रशिक्षणाची गरज असल्याचे सांगितले. तुषार भद्रे यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तिमत्त्वाचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींसाठी दीर्घकालीन उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यशाळेतील मंजिरी रसाळ व प्रवीण मुंढे यांनी मनोगत व्यक्त करत सलग दहा दिवसांच्या मार्गदर्शनातून आत्मविश्वास, बोलण्यातील स्पष्टता आणि संवादकौशल्य विकसित झाल्याची भावना व्यक्त केली. यानंतर कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थींना जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. जयंत लंगडे यांनी आभार मानले.

पुण्याहून संपूर्ण कुटुंबाचा सहभाग

भूमिशिल्प-दास्तान कला अकादमीच्या या कार्यशाळेला सातारा जिल्ह्यासह राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, पुण्यातील प्रवीण मुंढे कुटुंबातील तब्बल पाच सदस्यांनी साताऱ्यात येऊन संपूर्ण कार्यशाळेत सहभाग घेत भाषण आणि संभाषण कौशल्याचे धडे घेतले. अत्यंत माफक शुल्कात प्रभावी संवादकौशल्याचे मार्गदर्शन मिळाल्याने भविष्यात त्याचा निश्चितच उपयोग होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments