वाठार स्टेशन पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; सात आरोपी ताब्यात


वाठार स्टेशन पोलिसांचा

जुगार अड्ड्यावर छापा

सात आरोपी ताब्यात, रोख रकमेसह ३,४५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाठार स्टेशन : वाठार स्टेशन पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने बिचुकले गावच्या हद्दीत सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर धाड टाकत सात जणांना ताब्यात घेतले आहे. रोख रक्कम, जुगार साहित्य आणि मोटारसायकलींसह तब्बल ३ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे, फरार आरोपी आणि चोरीच्या गुन्ह्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी डी.बी. पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. दरम्यान, २७ मे २०२६ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मौजे बिचुकले येथील पळसवाट शिवारात काही व्यक्ती पैसे लावून तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने पंचांसह घटनास्थळी अचानक छापा टाकला. या कारवाईत सात जणांना जागीच पकडण्यात आले. आरोपींकडून जुगार साहित्य, रोख रक्कम आणि मोटारसायकली असा एकूण ३,४५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

याप्रकरणी वाठार पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे करीत आहेत. या गुन्ह्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे यांनी दिली आहे.

आरोपींची नावे अशी, अर्जुन नारायण पवार (वय ५०), मानसिंग साहेबराव पवार (वय ६१), विनोद हणमंत पवार (वय ४५), शिवाजी नथु शिंदे (वय ७०), अरुण धर्माजी सपकाळ (वय ६५), बाळकृष्ण चंदरराव पवार (वय ४७) सर्व रा. बिचुकले, ता. कोरेगाव, जि. सातारा आणि आण्णा शंकर पवार (वय ४६), रा. गुजरवाडी, ता. कोरेगाव.

या कारवाईत पोउनि गहिनीनाथ सातव, पोउनि नितीन भोसले, पोलीस हवालदार उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, पोलीस अंमलदार विठ्ठल काळे, प्रतिक देशमुख, तेजस कर्णे, विजय ढाणे तसेच महिला पोलीस कर्मचारी दिपाली गुरव, माधुरी दीक्षित, आशा देशमुख आणि पूजा जगताप यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments