म्हसवड पोलिसांची अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर धडक कारवाई

 


म्हसवड पोलिसांची

अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर

धडक कारवाई

घुबडेवाडीत १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

म्हसवड : म्हसवड पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू निर्मितीविरोधात कारवाई करत सुमारे १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास माण तालुक्यातील घुबडेवाडी परिसरात करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १४४/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (क)(ड)(इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जुबेरखान दोहेरखान पठाण (रा. पठाणवस्ती, चांदपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्याविरोधात कारवाई करण्यात आली असून आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून त्यास नोटीस देण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.

पोलिसांनी धुळदेव येथील घोडे खुर नाला परिसरातील बाभळीच्या झाडाखाली सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मितीच्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी घटनास्थळावरून दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य व रसायन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये २०० लिटर क्षमतेचे चार लोखंडी बॅरलमध्ये सुमारे ८०० लिटर रसायन, १५ लिटरच्या पाच पत्यांमध्ये सुमारे ७५ लिटर रसायन, १८० मिलीच्या बाटल्यांमधील हातभट्टी दारू तसेच २० लिटर क्षमतेचा प्लास्टिक कॅन यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे १८ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई म्हसवड पोलिसांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस हवालदार बंडू शिंदे करीत आहेत. परिसरातील अवैध दारू व्यवसायावर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments