भटक्या विमुक्तांच्या विविध मागण्यांसाठी साताऱ्यात धरणे आंदोलन


भटक्या विमुक्तांच्या

विविध मागण्यांसाठी

साताऱ्यात धरणे आंदोलन

माजी आमदार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी

सातारा : भटक्या विमुक्त जमातींच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पद्मश्री तथा माजी आमदार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून कार्यकर्ते, पदाधिकारी व समाजबांधव सहभागी झाले होते.

“चलो सातारा” या घोषवाक्यासह सकाळपासूनच आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली होती. सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनामध्ये शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भटक्या विमुक्त समाजाच्या न्याय्य मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला.

या आंदोलनामध्ये प्रामुख्याने हैद्राबाद गॅझेटियर लागू करणे, मूळ ४२ भटक्या विमुक्त जमातींना स्वतंत्र आरक्षण देणे, अनुसूचित जमातीमध्ये समावेश करणे, ओबीसी आरक्षणातून वगळणे, केंद्र शासनाच्या अनुसूचित जाती-जमातींप्रमाणे सवलती लागू करणे, भटक्या विमुक्तांची जातनिहाय जनगणना करणे, १९६१ चे पुरावे नसलेल्या नागरिकांना गृह चौकशीद्वारे जात प्रमाणपत्र देणे, निवासी अतिक्रमणे नियमित करणे तसेच विकासासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करणे या मागण्यांवर भर देण्यात आला.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून भटक्या विमुक्त समाज विविध शासकीय योजनांपासून वंचित राहत असून शिक्षण, रोजगार, निवास, आरक्षण आणि जात प्रमाणपत्राच्या प्रश्नांमुळे समाजाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी राज्य कार्यकारिणीतील नारायण जावळीकर, रामभाऊ जाधव, मछिंद्र जाधव, दत्ता पवार, हरिदास जाधव, अशोक जाधव, दिपक जाधव यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीतील दिलीपकुमार जाधव, स्वी गायकवाड, अंकुश जाधव, साहेबराव शिंदे, गंगाधर देशमुख, अशोक जाधव, श्रीरंग जाधव, बजरंग भोसले, राजीव शिर्के, शिवाजी शिंदे, राहुल भिंगारे, प्रकाश जाधव, दत्तात्रय जाधव, वसंतराव जाधव, अरुण साळुंखे आदी उपस्थित होते.

तालुका अध्यक्ष सागर पवार (सातारा), भगवान जाधव (कोरेगाव), रमेश जाधव (खटाव), दिलीप माने (माण), शंकर चव्हाण (कराड), विशाल साळुंखे (पाटण), अंकुश माने (खंडाळा), अनिल लाखे (वाई), संजय जावळे (जावली) आणि अमोल माने (फलटण) यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. आंदोलनाच्या शेवटी शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत सादर करण्यात आले.

Post a Comment

0 Comments