फलटणमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक


फलटणमध्ये गांजा विक्रीसाठी

आलेल्या दोघांना अटक

2 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

फलटण : स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि फलटण शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 4 किलो 69 ग्रॅम गांजा, एक मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 1 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आले आहे. अजित राजेंद्र कस्तुरे (वय 31), आदित्य रामचंद्र आतार (वय 25) अशी दोघांची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक सातारा निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी अवैध गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, दोन इसम बजाज प्लॅटिना मोटारसायकलवरून धुळदेव (ता. फलटण) हद्दीतील रावरामोशी पुलाजवळ गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहेत.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान दोन संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातील पिशवीची तपासणी केली असता 4 किलो 69 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे यांच्यासह दोन्ही पथकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments