आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते पाल येथे १ कोटी ६८ लाखांच्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन!


आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते 

पाल येथे १ कोटी ६८ लाखांच्या

मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन!

कराड तालुक्यातील ५१ गावांना मिळणार लाभ; 

टायगर बायो फिल्टर तंत्रज्ञानातून सांडपाणी शुद्धीकरणासह खतनिर्मिती

सातारा : माणदेश नगरी प्रतिनिधी 

ग्रामीण भागातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्याला चालना देण्यासाठी मौजे पाल (ता. कराड) येथे उभारण्यात आलेल्या १ कोटी ६८ लाख रुपये खर्चाच्या मैला गाळ व्यवस्थापन (Fecal Sludge Management) प्रकल्पाचे उद्घाटन आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत साकारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कराड तालुक्यातील ५१ गावांमधील सेप्टिक टाक्यांमधील मैला गाळाचे शास्त्रोक्त पद्धतीने संकलन व प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. ग्रामीण स्वच्छता व्यवस्थेच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या प्रकल्पांतर्गत कराड तालुक्यातील ५१ गावांमधील सेप्टिक टाक्यांमधील मैला गाळ विशेष वाहनाद्वारे संकलित करून पाल येथील प्रक्रिया केंद्रात आणला जाणार आहे. यासाठी शासनामार्फत मैला वाहतुकीसाठी स्वतंत्र विशेष वाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे गावोगावी मैला गाळाची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था निर्माण होणार असून, अस्वच्छतेमुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे टायगर बायो फिल्टर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. संकलित मैला गाळावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून पाण्याचे शुद्धीकरण तसेच खतनिर्मिती केली जाणार आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करता येणार असून, तयार होणाऱ्या खताची विक्री करून ग्रामपंचायत पालला उत्पन्नाचे साधनही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे स्वच्छतेसोबतच पर्यावरणपूरक व्यवस्थापन आणि ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नालाही हातभार लागणार आहे.

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांचे आरोग्य या बाबींना प्राधान्य देणारा हा प्रकल्प पाल गावासह कराड तालुक्यातील ५१ गावांसाठी उपयुक्त ठरणार आहे. मैला गाळ व्यवस्थापनाची शास्त्रोक्त सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामीण स्वच्छतेच्या क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

या उद्घाटन समारंभास जिल्हा परिषद सदस्य मदनभाऊ काळभोर, जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे, सुरेशतात्या पाटील, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, उपअभियंता जयदीप पाटील, जिल्हा तज्ज्ञ रवींद्र सोनवणे, राजेश भोसले, अजय राऊत, दादासो यादव, रणजीत पाटील, शंकरकाका शेजवळ, शिरगावचे सरपंच संतोष यादव पाटील, नागठाणेचे उपसरपंच अनिल साळुंखे, बांधकाम विभागाचे उपअभियंता माधव पाटील, सतीश शिंदे, पापा गोरे, संतोष पाटील, ऋषिकेश गोरे, सरपंच धनंजय घाडगे, उपसरपंच सुनीलनाना काळभोर, सुरेश पाटील, ग्रामपंचायत अधिकारी डी. आर. केंगार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments