दिवाळी फराळाच्या निमित्ताने पत्रकारांशी आमदार मनोजदादा घोरपडेंचा स्नेहसंवाद! आमदार मनोजदादा युवा मंचाचा जिल्ह्यात प्रथमच अनोखा उपक्रम

आमदार मनोजदादा घोरपडेंचा

दिवाळी फराळाच्या निमित्ताने 

पत्रकार बांधवांशी स्नेहसंवाद..!

आमदार मनोजदादा युवा मंचाचा जिल्ह्यात प्रथमच अनोखा उपक्रम;

विकासकामांसह जनतेच्या प्रश्नांवरही मनमोकळी चर्चा

सातारा : प्रतिनिधी 

दिवाळीच्या सणानिमित्त आमदार मनोजदादा युवा मंचाच्या वतीने माध्यम प्रतिनिधींसाठी दिवाळी फराळ आणि विशेष संवाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आल्याने पत्रकारांनी या उपक्रमाचे स्वागत केले. आमदार मनोजदादा घोरपडे, युवा नेते संग्राम बापू घोरपडे आणि विक्रमनाना घोरपडे यांच्या उपस्थितीत हा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या सोहळ्यास सातारा, कऱ्हाड, कोरेगाव आणि खटाव तालुक्यांतील विविध वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळी फराळाचा आस्वाद घेताना राजकीय घडामोडी, सामाजिक प्रश्न, कौटुंबिक स्नेह आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींवर मनमोकळी चर्चा रंगली. औपचारिकतेच्या पलीकडे जाऊन आपुलकीच्या वातावरणात झालेल्या या संवादामुळे कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. काशीळ, कोपर्डे, वेणेगाव आणि माजगाव येथील नदीवरील पुलांची कामे, राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणातील तांत्रिक तसेच स्थानिक अडचणी दूर करण्यासाठी आमदारांनी केलेला पाठपुरावा यावर चर्चा झाली. उंब्रज येथील महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम आणि पाल येथील महत्त्वाकांक्षी मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचाही यावेळी उल्लेख करण्यात आला.

मतदारसंघातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आमदार घोरपडे करीत असलेले प्रयत्नही चर्चेचा विषय ठरले. विकासकामांबरोबरच स्थानिक नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांच्यात सातत्यपूर्ण संवाद असणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

राजकीय मतभेद बाजूला ठेवून स्नेहबंध जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे माध्यम प्रतिनिधींनी नमूद केले. पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील थेट संवादातून मतदारसंघातील प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या अपेक्षांना अधिक प्रभावीपणे वाचा फुटेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. या अनोख्या स्नेहमेळाव्याच्या यशस्वितेसाठी आमदार मनोजदादा युवा मंचाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments