साताऱ्यातील 'चेन स्नॅचर' अखेर जेरबंद; सात ठिकाणच्या सोनसाखळी चोरींचा उलगडा; महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या सराईत आरोपीला अटक; १२.७५ लाखांचा ऐवज जप्त, सात गुन्ह्यांची कबुली

साताऱ्यातील

'चेन स्नॅचर' अखेर जेरबंद

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या सराईत आरोपीला अटक

१२.७५ लाखांचा ऐवज जप्त, सात गुन्ह्यांची कबुली

सातारा | प्रतिनिधी

सातारा शहरासह शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही आठवड्यांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढणाऱ्या सराईत चेन स्नॅचरला सातारा शहर डी.बी. पथकाने अखेर जेरबंद केले आहे. आरोपीकडून सात सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून तब्बल १२ लाख ७५ हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे शहरासह परिसरात सुरू असलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सिद्धीविनायक मंगल कार्यालय ते अश्विनी पार्क, संगमनगर, प्रतापसिंहनगर परिसरातील रस्त्यावरून एक महिला पायी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पलायन केले होते. या घटनेनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर शहरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, शहरातील तसेच उपनगरातील विविध भागांत याच पद्धतीने महिलांना लक्ष्य करून मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे हा एकच आरोपी असल्याचा पोलिसांना संशय होता.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी सातारा शहर डी.बी. पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार डी.बी. पथकाने घटनास्थळांची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासादरम्यान सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या सातही घटनांमधील आरोपी एकच असल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मोटारसायकलवरून पुणे-सातारा महामार्गाने साताऱ्यात येत असल्याचे आणि चोरी करून पुन्हा त्याच मार्गाने पसार होत असल्याचे आढळून आले. या माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने आनेवाडी व पाचवड परिसरात सापळा रचला. दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी संशयित आरोपी पाचवड परिसरात आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डी.बी. पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण व कसून चौकशीत त्याने सात ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली दिली.

आरोपीकडून चोरीस गेलेले १२ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करून जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे क्रमांक ५८५/२०२६, ५९९/२०२६, ६०१/२०२६ व ६१६/२०२६, सातारा तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ३०९/२०२६, तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे क्रमांक २१२/२०२६ व २२०/२०२६ असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रीपाद ज्ञानेश्वर लोळगे (वय ३७, रा. साईविश्व अपार्टमेंट, पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधिक तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, सातारा शहरचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे आणि शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर डी.बी. पथक, शाहूपुरी डी.बी. पथक, सायबर पोलीस तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

या कारवाईमुळे साताऱ्यातील महिलांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली असून, पोलिसांनी नागरिकांना रात्री अथवा निर्जन ठिकाणी एकटे प्रवास करताना सतर्क राहण्याचे, मौल्यवान दागिने उघडपणे न घालण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments