सरपंचांचा कारभार संपणार?
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा!
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींबाबत महत्त्वाची अधिसूचना जारी केली असून, मुदत संपलेल्या आणि प्रशासकीय अडचणींमुळे निवडणूक घेता न आलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) प्रत्यायोजित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम १८२(१) तसेच कलम १५१(१)(अ) मधील तरतुदींनुसार शासनाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जारी करण्यात आलेल्या संबंधित अधिसूचना व आदेश अधिक्रमित करून हे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
ज्या ग्रामपंचायतीची मुदत समाप्त झाली आहे आणि प्रशासकीय अडचणींमुळे त्या ग्रामपंचायतीची निवडणूक घेता आलेली नाही, अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त केला जाणार आहे. या पदासाठी विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (आरोग्य), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (पंचायत) किंवा अन्य कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करता येणार आहे.
अधिसूचनेनुसार प्रशासकाची नियुक्ती राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांपर्यंत किंवा ग्रामपंचायत स्थापनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत राहणार आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रशासकीय कारणांमुळे रखडल्या आहेत, तेथे सरपंचांच्या नेतृत्वाऐवजी प्रशासकीय यंत्रणेकडे कारभार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये राजकीय व प्रशासकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!