AI मॉर्फिंगप्रकरणी मंत्री शिवेंद्रराजे समर्थकांची तक्रार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

AI मॉर्फिंगप्रकरणी 

मंत्री शिवेंद्रराजे 

समर्थकांची तक्रार;

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल


सातारा | प्रतिनिधी


सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सातारा-जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा AI व डिजिटल मॉर्फिंगद्वारे तयार केलेला कथित आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी याबाबत मंत्री समर्थक व कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती.


तक्रारीनंतर दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, ६ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘राजधानी सातारा दहीहंडी उत्सव २०२६’मधील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मूळ छायाचित्रात डिजिटल पद्धतीने बदल करून कथित आक्षेपार्ह फोटो तयार करण्यात आला. हा फोटो भावना दुखावणारा व दिशाभूल करणाऱ्या मजकुरासह फेसबुक आणि युट्यूबवर प्रसारित करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


दरम्यान, सार्वजनिक बांधकाममंत्री, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा कथितरीत्या AI तंत्रज्ञानाचा वापर करून एडिट केलेला फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना तक्रार अर्ज देऊन करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते व त्यांच्या समर्थकांनी केली आहे.


तक्रारीनुसार, एका युट्युब चॅनेलवरून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा फोटो बदल करून तो आक्षेपार्ह पद्धतीने प्रसारित करण्यात आल्याचा आरोप शिवेंद्रराजे समर्थकांनी केला आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारे चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होऊ नये, तसेच संबंधित पोस्टमागील व्यक्तींची चौकशी करून सत्यता स्पष्ट करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी तक्रारीत केली आहे.


या प्रकरणी ‘प्रतीक थोरात देशभक्त Gen Z’, ‘सोनाली देशमुख’, ‘हरी शिंदे’ आणि ‘माणदेश-प्राइम-न्यूज’ या सोशल मीडिया अकाउंट/चॅनेलशी संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सातारा शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५३(२), ३५६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६७ अन्वये FIR क्र. ०७१०/२०२६ दाखल केला आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जनसंपर्क अधिकारी अमर बाळासाहेब मोकाशी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन म्हात्रे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments