डीजेवर बंदी;
परवानगीशिवाय मिरवणूक
काढल्यास कारवाई
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेढा पोलिसांची मंडळांना स्पष्ट सूचना
महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणार
मेढा | प्रतिनिधी
गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी परवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक काढू नये; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मेढा पोलिसांनी दिला. डीजेच्या वापरावर बंदी असून, मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जावळी तालुक्यात प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर मेढा पोलीस ठाण्याच्या वतीने हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात विविध सूचना देण्यात आल्या.
जावळीचे तहसीलदार प्रवीण मुदगुल यांनी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. गणेशोत्सव हा सर्वांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण असून, तो साजरा करताना कायदा व प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक मंडळाने संबंधित प्रशासकीय विभागाची आवश्यक परवानगी घेऊनच उत्सवाचे नियोजन करावे. उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी मंडळांनी स्वयंशिस्त पाळावी, असे त्यांनी सांगितले.
मेढा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मंडळांना मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनीही नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. मंडप उभारताना वाहतूक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी गणेशोत्सव मंडळांना नियमांची माहिती देताना सांगितले की, डीजेच्या दणदणाटावर बंदी असून, मिरवणुका केवळ पारंपरिक वाद्यांच्या तालावरच काढाव्यात. मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. रस्त्याच्या कडेला अथवा वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी गणेश मंडप किंवा शेड उभारू नये. गणेशमूर्ती स्थापनेपासून विसर्जनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर संबंधित विभागाची आवश्यक लेखी परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव मंडळांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद, भांडण अथवा तंटे होणार नाहीत, याची पदाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. सोशल मीडियावर आक्षेपार्ह, धार्मिक भावना दुखावणारा किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारा मजकूर पोस्ट अथवा व्हायरल करू नये, असेही पोलिसांनी बजावले.
गणेशोत्सवाचा आनंद प्रत्येक नागरिकाला, विशेषतः महिला भगिनींना निर्भय आणि सुरक्षित वातावरणात घेता यावा, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी सांगितले. उत्सव काळात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीच्या निमित्ताने जावळी तालुक्यात उल्लेखनीय व विशेष कामगिरी बजावणाऱ्या पोलीस पाटलांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या सूचनांचे काटेकोर पालन करून गणेशोत्सव भक्तिभावाने आणि शांततेत साजरा करण्याचा निर्धार मंडळांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.
बैठकीस जावळीचे तहसीलदार प्रवीण मुदगुल, मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगटे, पोलीस हवालदार सुनील वाघमळे, ओंकार दीक्षित यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील तसेच तालुक्यातील विविध गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या सूचनांचे पालन करून जावळी तालुक्यातील गणेशोत्सव शांतता, शिस्त, भक्तिभाव आणि सामाजिक सलोखा राखत साजरा व्हावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!