‘डीजे नको, व्यसनमुक्त समाज अन् महिला-युवती सुरक्षा’चा नारा! शिरवळमध्ये ५६०० नागरिकांची भव्य जनजागृती रॅली; पोलिसांचा कायद्याचा धाक निर्माण करण्याचा निर्धार

‘डीजे नको, व्यसनमुक्त समाज

अन् महिला-युवती सुरक्षा’चा नारा

शिरवळमध्ये ५६०० नागरिकांची भव्य जनजागृती रॅली


पोलिसांचा कायद्याचा धाक निर्माण करण्याचा निर्धार


खंडाळा | प्रतिनिधी


आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिरवळ पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. ध्वनी प्रदूषण टाळा, डीजेचा वापर करू नका, व्यसनमुक्त समाज घडवा आणि महिला-युवतींची सुरक्षा सुनिश्चित करा, असा संदेश देत शिरवळमध्ये पोलिसांच्या पुढाकाराने भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थी, युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था, ग्रामस्थ तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते अशा तब्बल ५६०० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.



कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे शिरवळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी सांगितले.


सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या संकल्पनेतून शिरवळ पोलीस स्टेशनच्या वतीने ‘गणेशोत्सवात डीजेचा वापर नको, व्यसनमुक्त समाज, महिला-युवती सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.



शिरवळ येथील प्रगती गर्ल्स हायस्कूल, ज्ञानसंवर्धिनी प्रशाला, आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक मुले शाळा, सटवाई कॉलनीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल, ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूल, रयत इंग्लिश मीडियम स्कूल, श्रीपतराव कदम महाविद्यालय, रोटरी क्लब शिरवळ-खंडाळा, शिरवळ ग्रामपंचायत, शिरवळ जिमखाना, महिला बचत गट, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक संघ, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.


शिरवळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शहाजी महाराज चौक, एस.टी. स्टँड परिसर, मेन रोड, शासकीय विश्रामगृह चौक, चावडी चौक, केदारेश्वर कॉलनी, बाजारपेठ मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला.



रॅलीदरम्यान ‘शिरवळ हूपर’ म्हणून प्रसिद्ध असलेली स्नेहल असलेकर ही प्रमुख आकर्षण ठरली. तिच्या उपस्थितीने रॅलीतील उत्साहात भर पडली. यावेळी स्नेहल असलेकर हिने उपस्थित नागरिकांना व्यसनमुक्ती, ध्वनी प्रदूषण टाळणे तसेच महिला व युवतींच्या सुरक्षेबाबत शपथ दिली.


जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विविध सामाजिक संस्था, शाळा आणि महाविद्यालयांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. गणेशोत्सव आणि आगामी सण-उत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात व सामाजिक सलोखा राखून पार पाडण्यासाठी शिरवळ पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.

Post a Comment

0 Comments