सातारा नगरपालिकेची गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी; पर्यावरणपूरक मंडळांना ५ हजारांचे प्रोत्साहनपर बक्षीस; विसर्जन मार्ग, कृत्रिम विसर्जन तळे, स्वच्छता व सुरक्षिततेवर विशेष भर ; नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडून पाहणी



सातारा नगरपालिकेची

गणेशोत्सवासाठी

जय्यत तयारी

पर्यावरणपूरक मंडळांना ५ हजारांचे प्रोत्साहनपर बक्षीस

विसर्जन मार्ग, कृत्रिम विसर्जन तळे, स्वच्छता व सुरक्षिततेवर विशेष भर

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडून पाहणी

सातारा|प्रतिनिधी

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेने शहरातील गणेश मंडळे आणि भाविकांसाठी विविध उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे. गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी वाहतूक कोंडी टाळण्याबरोबरच विसर्जन प्रक्रिया सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी, यासाठी विसर्जन मार्ग तसेच कृत्रिम विसर्जन तळ्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी विसर्जन मार्ग आणि कृत्रिम विसर्जन तळ्याची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेतला. भाविकांची सुरक्षितता, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, प्रवेश व बाहेर पडण्याची व्यवस्था तसेच आवश्यक सुविधा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने विसर्जनाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थापनाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश नगरपालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक मनोज शेंडे, अक्षय जाधव, विश्वतेज बालगुडे, रविराज किर्दत, बांधकाम विभागाचे उपअभियंता विनोद दहिफळे, नियंत्रण अधिकारी दिलीप चिद्रे तसेच नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विशेष स्पर्धा

सातारा शहरातील गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक, शाश्वत आणि समाजप्रबोधनात्मक व्हावा, यासाठी नगरपालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत शाडूच्या मातीची गणेशमूर्ती, पारंपरिक वाद्यांचा वापर, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, कचरा वर्गीकरण व व्यवस्थापन, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे देखावे या बाबींना प्राधान्य दिले जाणार आहे. पर्यावरण संवर्धन, पाणी बचत, वृक्षसंवर्धन, जैवविविधता, प्लास्टिकमुक्ती, ऊर्जा बचत, नदी संवर्धन आणि स्वच्छता यांसारख्या विषयांवर आधारित समाजप्रबोधनपर देखाव्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

उत्कृष्ट मंडळांना ५ हजारांचे प्रोत्साहनपर बक्षीस

पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १० मंडळांना प्रत्येकी ५ हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचे प्रस्तावित आहे. तसेच ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि पारंपरिक वाद्यांचा प्रभावी वापर करणाऱ्या पात्र मंडळांना प्रत्येकी ५ हजार रुपये, तर उत्कृष्ट १० पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्तींनाही प्रत्येकी ५ हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचे प्रस्तावित आहे. या उपक्रमासाठी सातारा नगरपरिषद तसेच वाहतूक पोलिसांची आवश्यक मंजुरी घेणाऱ्या पात्र गणेश मंडळांचाच विचार करण्यात येणार असून, अधिकृत समितीमार्फत बक्षिसांचे वाटप केले जाणार आहे.

दोन्ही राजेंच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरातील गणेश मंडळांसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे नगरपालिकेकडून सांगण्यात आले. गणेशोत्सवाची परंपरा जपत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक प्रबोधनाला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या माध्यमातून सातारा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सकारात्मक संस्कृती निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments