मेढा : कुडाळ येथे कातकरी समाजासाठी खरेदी करण्यात आलेल्या १२ गुंठे जमिनीच्या दस्त प्रक्रियेदरम्यान उपस्थित गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, निबंधक अधिकारी, कातकरी समाजाचे लाभार्थी व अन्य मान्यवर.
कातकरी बांधवांसाठी
१२ गुंठे जमीन खरेदी
२५ कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार
कुडाळ ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम
मेढा | प्रतिनिधी
जावळी तालुक्यातील कुडाळ ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत भूमिहीन कातकरी समाजासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून १२ गुंठे जमीन खरेदी करण्यात आली असून, या जमिनीवर कातकरी समाजासह इतर समाजातील सुमारे २५ लाभार्थ्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी निवाऱ्यापासून वंचित असलेल्या कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जावळी पंचायत समितीचे सभापती सौरभ (बाबा) शिंदे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय जमीन खरेदी अर्थसहाय योजना अंतर्गत ही जमीन खरेदी करण्यात आली. नुकताच या जमिनीचा खरेदी दस्त पूर्ण झाला.
कुडाळमधील कातकरी समाजातील अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे स्वतःच्या घरापासून वंचित होती. कायमस्वरूपी जागा नसल्यामुळे मिळेल त्या ठिकाणी तात्पुरता निवारा करून जीवन जगणाऱ्या या कुटुंबांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरला आहे. आता शासकीय नियमानुसार प्रत्येक पात्र लाभार्थ्यास घरकुलासाठी आवश्यक अनुदान उपलब्ध होणार असून, त्यातून स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
या उपक्रमामुळे केवळ निवाऱ्याची समस्या दूर होणार नसून कातकरी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीलाही चालना मिळणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभही या कुटुंबांना अधिक प्रभावीपणे मिळू शकणार असल्याने त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार प्रवीण मुदगुल, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, नायब तहसीलदार सुनील मुनाळे, विस्तार अधिकारी डी. एल. सुरवसे, कुडाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा प्रशासक सुरेखा कुंभार, उपसरपंच सोमनाथ कदम, माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी उमेश जाधव, मंडल अधिकारी आर. बी. कोळी, तलाठी दत्तात्रय प्रभाळे, ग्रामपंचायत सदस्य तसेच घरकुलासाठी जमीन उपलब्ध करून देणारे सुभाष जगन्नाथ कुंभार यांचे विशेष सहकार्य लाभले.
सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून जमीन खरेदीची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण झाली. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, दुर्लक्षित आणि वंचित कातकरी समाजाच्या सन्मानपूर्वक पुनर्वसनाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ग्रामीण भागात सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येते, याचे कुडाळ ग्रामपंचायतीने आदर्श उदाहरण घालून दिल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!