हातगेघरमध्ये 'हायव्होल्टेज'
राजकारणाला पोलिसांचा ब्रेक!
सोसायटी ठरावाच्या पार्श्वभूमीवर दोन गटांचे शक्तिप्रदर्शन हाणून पाडले
जावळीत तणाव, हातगेघर गावात पोलिसांचे संचलन
संतोष शिराळे | मेढा (जावळी)
जावळी तालुक्यातील हातगेघर येथे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या ठरावाच्या निमित्ताने उभ्या राहिलेल्या संभाव्य राजकीय संघर्षाला सातारा पोलिसांनी वेळीच लगाम घातला. त्याच दिवशी, त्याच परिसरात दोन वेगवेगळ्या राजकीय गटांचे स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने शक्तिप्रदर्शनाची शक्यता निर्माण झाली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी दोन्ही कार्यक्रमांना परवानगी नाकारत मोठा बंदोबस्त तैनात केला. मंगळवारी गावात झालेल्या पोलिस संचलनामुळे हातगेघर दिवसभर चर्चेचा विषय ठरले.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला असून विविध कार्यकारी सोसायट्यांच्या ठरावांभोवती राजकीय समीकरणे आकार घेत आहेत. अशाच पार्श्वभूमीवर बुधवार (दि. ५) रोजी हातगेघर येथील एन. एन. शहा हायस्कूल परिसरात सोसायटीच्या ठरावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
हातगेघरमध्ये एका बाजूला विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या ठरावाचा कार्यक्रम, तर दुसऱ्या बाजूला आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते अभिष्टचिंतन सोहळा तसेच जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे आणि उपसभापती गोरख महाडिक यांच्या उपस्थितीत विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन असे दोन स्वतंत्र राजकीय गटांचे कार्यक्रम एकाच परिसरात नियोजित होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समर्थक जमा होऊन दोन्ही गट आमनेसामने येण्याची भीती पोलिस प्रशासनाने व्यक्त केली होती. मेढा पोलिसांच्या या अहवालानंतर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३ अंतर्गत एन. एन. शहा हायस्कूल परिसराच्या २०० मीटरच्या हद्दीत ५ व ६ ऑगस्टदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. त्यानुसार सभा, मेळावे, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले. कोणत्याही एका गटाला झुकते माप न देता दोन्ही कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली.
मंगळवारी हातगेघरमध्ये पोलिसांनी संचलन करत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले. अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस वाहनांच्या उपस्थितीमुळे गावात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांच्या या कारवाईमुळे संभाव्य संघर्ष टळला असला, तरी या घटनेने जावळी तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापल्याची चर्चा सुरू आहे.
आगामी सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावागावांत सुरू असलेली मोर्चेबांधणी, बैठका आणि शक्तिप्रदर्शनाच्या हालचाली अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश सातारा पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!