'गेट उघडा... संचालक परत द्या!' शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर वसंतराव मानकुमरे यांचे ठाण; हातगेघर सोसायटीचा ठराव रद्द होताच समर्थकांसह हुमगावला धडक

 

'गेट उघडा... संचालक परत द्या!' 

शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर वसंतराव मानकुमरे यांचे ठाण

हातगेघर सोसायटीचा ठराव रद्द होताच समर्थकांसह हुमगावला धडक

संतोष शिराळे | मेढा/जावळी

हातगेघर पंचक्रोशी विकास सेवा सोसायटीचा ठराव कोरमअभावी रद्द झाल्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील संघर्ष थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या हुमगाव येथील निवासस्थानापर्यंत पोहोचला. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी समर्थकांसह शिंदे यांच्या निवासस्थानी धडक देत मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच ठाण मांडले. यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. 

निवासस्थानाचे मुख्य गेट बंद असल्याने मानकुमरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "आम्ही चर्चा करण्यासाठी आलो आहोत. गेट का बंद आहे? आमचे संचालक कुठे आहेत? त्यांना आमच्यासमोर आणा. संचालक परत मिळाल्याशिवाय आणि समाधानकारक उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही," अशी भूमिका त्यांनी घेतली. 

हातगेघर विकास सेवा सोसायटीच्या ठरावासाठी आवश्यक असलेल्या सहा संचालकांपैकी केवळ दोनच संचालक उपस्थित राहिल्याने ठरावाची प्रक्रिया रद्द झाली. उर्वरित संचालक जाणीवपूर्वक बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप मानकुमरे यांनी केला असून, या आरोपांची त्यांनी थेट शशिकांत शिंदे यांच्याकडे जाऊन विचारणा केली.

दरम्यान, या तणावपूर्ण वातावरणानंतर शशिकांत शिंदे आणि वसंतराव मानकुमरे यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली किंवा त्यातून काही तोडगा निघाला का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दोन्ही नेत्यांनीही बैठकीच्या तपशीलाबाबत मौन बाळगल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस सतर्क होते. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण असूनही कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला नाही.



घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना वसंतराव मानकुमरे यांनी, "आज आमचा ठराव रोखण्यात आला. पण हा संघर्ष इथेच संपणार नाही. योग्य वेळी राजकारण काय असते ते दाखवून देऊ," असा इशारा दिला. शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर घडलेल्या या नाट्यमय घटनांमुळे सातारा जिल्हा बँक निवडणुकीतील राजकीय संघर्ष आता अधिक उघडपणे समोर आला असून, पुढील काळात या घडामोडींचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments