ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतीत आधुनिकतेची नवी क्रांती; युवा उद्योजकांना रामकृष्ण वेताळ यांचे प्रोत्साहन

ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतीत

आधुनिकतेची नवी क्रांती

युवा उद्योजकांना रामकृष्ण वेताळ यांचे प्रोत्साहन

संतोष शिराळे, सातारा | प्रतिनिधी

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक कार्यक्षम, अचूक आणि किफायतशीर करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन रामकृष्ण वेताळ यांनी केले. युवा उद्योजक सुभाष पवार यांच्या ड्रोन फवारणी यंत्राची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी रामकृष्ण वेताळ यांनी ड्रोनच्या साहाय्याने करण्यात येणारी पिकांवरील फवारणी, त्याची कार्यपद्धती, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीतील उपयुक्तता याची सविस्तर माहिती घेतली. ड्रोनच्या माध्यमातून कमी वेळेत अधिक क्षेत्रावर अचूक फवारणी करता येते, त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, मजुरी आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना वेताळ म्हणाले, "आजच्या काळात शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज आहे. ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेती अधिक आधुनिक, अचूक आणि उत्पादनक्षम बनत आहे. यामुळे केवळ शेतकऱ्यांनाच फायदा होत नाही, तर ग्रामीण भागातील युवकांसाठीही उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत."

ते पुढे म्हणाले की, ड्रोन सेवा, अ‍ॅग्रीटेक स्टार्टअप्स, डिजिटल कृषी सेवा, डेटा व्यवस्थापन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित शेती यांसारख्या आधुनिक संकल्पना ग्रामीण भागात वेगाने रुजत आहेत. या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून युवकांनी रोजगारनिर्मितीबरोबरच कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता सिद्ध केली आहे.

युवा उद्योजक सुभाष पवार यांनी उभारलेला हा उपक्रम इतर युवकांसाठी प्रेरणादायी असून, अशा नाविन्यपूर्ण प्रयोगांना शासन आणि समाजानेही प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे वेताळ यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments