साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी
यांच्या निधनाने साहित्यविश्वाची
मोठी हानी : पृथ्वीराज चव्हाण
कराड | प्रतिनिधी
कराडचे ज्येष्ठ साहित्यिक, महाराष्ट्र शासनाच्या 'विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार' सन्मानाने गौरविण्यात आलेले श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वातील संवेदनशील, अभ्यासू आणि मूल्यनिष्ठ लेखक हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केलेल्या शोकसंदेशात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, श्रीनिवास कुलकर्णी यांनी पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा, डोह आणि सोन्याचा पिंपळ यांसारख्या साहित्यकृतींमधून समृद्ध अनुभवविश्व प्रभावी शब्दांत उभे केले. चित्रदर्शी शब्दकला, चित्रकलेतील संस्कारातून आलेली दृष्यमयता, निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण आणि अनुभवाच्या गाभ्यापर्यंत पोहोचणारी पारदर्शी लेखनशैली ही त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होती.
ललित लेखनाला नवे परिमाण देणारे लेखक म्हणून श्रीनिवास कुलकर्णी यांचे नाव मराठी साहित्यविश्वात आदराने घेतले जाते. त्यांचे साहित्य मराठीसोबतच कानडी, बंगाली आणि इंग्रजी भाषेतही पोहोचले. महाराष्ट्र फाउंडेशनच्या साहित्यरत्न पुरस्कारासह महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा 'विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार' मिळणे ही त्यांच्या प्रदीर्घ साहित्यसेवेची योग्य दखल असल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले.
कराडच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरेला समृद्ध करणाऱ्या श्रीनिवास कुलकर्णी यांच्या कार्याचा कराडकरांना कायम अभिमान राहील, असे सांगत त्यांच्या निधनाने साहित्य आणि संस्कृती क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. शेवटी त्यांनी कुलकर्णी कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त करत, दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!