पाचवड–खेड महामार्गासह
सात कोटींच्या अंतर्गत
रस्त्यांच्या कामांवर
कुडाळ ग्रामस्थांचा आक्षेप
१४ ऑगस्टपर्यंत कामांचा खुलासा करावा
...अन्यथा सामूहिक उपोषणाचा इशारा
कुडाळ | प्रतिनिधी
जावळी तालुक्यातील कुडाळ येथे सुरू असलेल्या पाचवड–खेड राष्ट्रीय महामार्गावरील तसेच इंदिरानगर ते बाजारपेठ मार्गे छत्रपती संभाजी महाराज चौक या सुमारे सात कोटी रुपयांच्या प्राथमिक जिल्हा मार्गाच्या कामांबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कामे रखडल्याने, अर्धवट अवस्थेत सोडल्याने आणि काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित विभाग व ठेकेदाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. १४ ऑगस्टपर्यंत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन कामांचा खुलासा करावा, अन्यथा १५ ऑगस्टपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामूहिक उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून पाचवड–खेड राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असले तरी अनेक ठिकाणी पूल पूर्ण होऊनही त्यावरील काँक्रिटीकरण झालेले नाही. विशेषतः कुडाळ चौकातील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही रस्ता वापरासाठी तयार नसल्याने वाहनधारक, व्यापारी, विद्यार्थी, शालेय मुले आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्डे, खडी, मुरूम आणि चिखलामुळे अपघाताचा धोका वाढला असून पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.
कुडाळ चौक हा सरताळे, बोराटे वस्ती, डबडेवाडी, सोनगाव, दरे आदी गावांना जोडणारा महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र अपूर्ण कामांमुळे वाहतूक कोंडी, धुळीचे साम्राज्य, चिखल आणि पाणी साचण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्त्यालगतची गटारेही अपूर्ण असल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचत असून नागरिकांचे हाल होत आहेत.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून कुडाळमध्ये इंदिरानगर ते बाजारपेठ मार्गे छत्रपती संभाजी महाराज चौक या प्राथमिक जिल्हा मार्गाच्या सुमारे सात कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र हे कामही गेल्या वर्षभरापासून अत्यंत संथ गतीने सुरू असून अर्धवट कामांमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले आणि व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची अनौपचारिक बैठक झाली. बैठकीनंतर ग्रामसभा बोलावण्याची मागणी ग्रामसेवकांकडे करण्यात आली. तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून कामाचा वेग वाढविण्याच्या आणि त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन १४ ऑगस्ट २०२६ पूर्वी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी कुडाळ येथे प्रत्यक्ष येऊन नागरिकांशी संवाद साधावा, कामाची पाहणी करावी आणि रस्त्याची रुंदी, गटारांची रचना, पुढील कामाचे नियोजन व पूर्णत्वाचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत कोणताही खुलासा न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ पासून ग्रामपंचायत कुडाळ कार्यालयासमोर सर्व जागरूक नागरिक आणि युवक सामूहिक उपोषण सुरू करतील, असा इशारा समस्त ग्रामस्थ, कुडाळ यांच्या वतीने देण्यात आला आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून या काळात या मार्गावर मोठ्या प्रमाणात भाविक आणि वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे सणापूर्वी सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मंत्रीमहोदयांनी तातडीने लक्ष घालावे
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. मात्र पाचवड–खेड राष्ट्रीय महामार्गासह कुडाळमधील अंतर्गत रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांची तातडीने बैठक घेऊन कामांना गती देण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच गणेशोत्सवापूर्वी सर्व अपूर्ण कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी कुडाळ ग्रामस्थांनी केली आहे.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!