'हातगेघर'ने वसंतराव मानकुमरे यांचे जिल्हा बँकेचे स्वप्न रोखले? अखेरच्या दिवशी हातगेघर पंचक्रोशी विकास सोसायटीचा ठराव कोरमअभावी रद्द; ठराव हुकताच शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी मानकुमरे यांची धडक, गेटबाहेर ठाण; जावळीत सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे राजकारण शिगेला


'हातगेघर'ने वसंतराव मानकुमरे

यांचे जिल्हा बँकेचे स्वप्न रोखले?


अखेरच्या दिवशी हातगेघर पंचक्रोशी विकास सोसायटीचा ठराव कोरमअभावी रद्द


ठराव हुकताच शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी मानकुमरे यांची धडक, गेटबाहेर ठाण


जावळीत सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे राजकारण शिगेला


संतोष शिराळे | मेढा / जावळी 


सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यात बुधवारी राजकीय नाट्याचा कळस गाठला. विकास सेवा सोसायट्यांचे ठराव सादर करण्याचा अखेरचा दिवस असताना, हातगेघर, पानस, आखेगणी, विवर, कावडी आणि सायघर या सहा गावांचा समावेश असलेल्या हातगेघर पंचक्रोशी विकास सेवा सोसायटीत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांच्या नावाचा ठरावच होऊ शकला नाही. आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने बैठक रद्द झाली आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच संघर्ष थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानाच्या दारात जाऊन पोहोचला.


सोसायटीमध्ये एकूण दहा संचालक असून ठरावासाठी किमान सहा संचालकांची उपस्थिती आवश्यक होती. मात्र, बैठकीला वसंतराव मानकुमरे यांच्यासह केवळ दोनच संचालक उपस्थित राहिले. उर्वरित आठ संचालक अनुपस्थित राहिल्याने कोरम पूर्ण होऊ शकला नाही. परिणामी ठरावाची प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे मानकुमरे यांच्या नावाचा ठराव मांडण्याची प्रक्रिया पुढेच जाऊ शकली नाही. त्यांच्या नावाला आवश्यक अनुमोदकही मिळू शकला नाही. ठराव दाखल करण्याचा आजचा (दि. पाच) अखेरचा दिवस असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील त्यांच्या राजकीय दाव्याला मोठा धक्का बसल्याची चर्चा सहकार वर्तुळात सुरू झाली.



ठराव रद्द होताच संतप्त झालेले वसंतराव मानकुमरे समर्थकांसह थेट शशिकांत शिंदे यांच्या हुमगाव येथील निवासस्थानी पोहोचले. निवासस्थानाचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. "आम्ही तुमच्या दारात आलो आहोत... गेट का उघडत नाही? आमचे संचालक कुठे आहेत? त्यांना आमच्यासमोर आणा. संचालक परत मिळाल्याशिवाय आणि योग्य उत्तर दिल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही," अशी भूमिका घेत त्यांनी दाराबाहेरच ठाण मांडले.


यावेळी मानकुमरे यांनी अनुपस्थित संचालकांना जाणीवपूर्वक बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांच्या गटावर केला. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, त्यानंतर शशिकांत शिंदे आणि वसंतराव मानकुमरे यांच्यात एका खोलीत चर्चा झाली. मात्र, या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली किंवा त्यातून काय निष्पन्न झाले, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.


पत्रकारांशी बोलताना मानकुमरे यांनी, "आज रणनीती आखून आमचा ठराव रोखण्यात आला. पण हा संघर्ष इथेच थांबणार नाही. योग्य वेळी राजकारण काय असते ते दाखवून देऊ," असा थेट इशाराच शशिकांत शिंदे यांना दिला. यापूर्वी आखाडे विकास सेवा सोसायट्यांच्या ठरावावेळी झालेल्या संघर्षामुळे प्रशासन आधीपासूनच सतर्क होते. त्यामुळे मंगळवारपासूनच हातगेघर गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. कलम १४४ लागू करून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक हालचालीवर पोलीस करडी नजर ठेवून होते. त्यामुळे ठरावाच्या निमित्ताने मोठा राजकीय संघर्ष पोलिसांना टाळता आला.


हातगेघरमधील घडामोडी ही केवळ एका सोसायटीच्या ठरावापुरती मर्यादित नसून, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय वर्चस्वाच्या लढाईतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आखाडे आणि हातगेघरच्या या सलग घटनांमुळे जावळी तालुका संपूर्ण जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

हातगेघर पंचक्रोशी विकास सेवा सोसायटीतील घडामोडींनी सातारा जिल्हा बँक निवडणुकीची लढत अधिकच चुरशीची बनवली आहे. ठरावाच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या या घटनांमुळे सहकार आणि राजकारणातील संघर्ष आता उघडपणे समोर आला असून, त्याचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटणार हे निश्चित मानले जात आहे.


घडामोडीतील ठळक बाबी


- विकास सेवा सोसायट्यांचे ठराव दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी हातगेघरचा ठराव कोरमअभावी रद्द.


- सहा गावांच्या सोसायटीत एकूण १० संचालक; ठरावासाठी आवश्यक ६ पैकी केवळ २ उपस्थित.


- वसंतराव मानकुमरे यांच्या नावाचा ठराव होऊ शकला नाही; अनुमोदकही मिळू शकला नाही.


- चार संचालकांना बैठकीपासून दूर ठेवल्याचा मानकुमरे यांचा शशिकांत शिंदे गटावर आरोप.


- ठराव रद्द होताच शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी वसंतराव मानकुमरे पत्नीसह दाखल


- दोन्ही नेत्यांमध्ये बंद खोलीत चर्चा; तपशील अद्याप गुलदस्त्यात.


- मंगळवारपासून हातगेघर गावात कलम १४४ व कडेकोट पोलीस बंदोबस्त.


दिवसभरातील सर्व घडामोडीनंतर वसंतराव मानकुमरे यांच्या विरोधकांनीही आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले असून, वसंतराव मानकुमरे यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.


राजकीय कारकीर्दीच्या शेवटाची सुरुवात 


 "ज्या ठिकाणी स्वतःची राजकीय कारकीर्द घडवली, ज्याला स्वतःचं गाव मानलं, तिथं आज या व्यक्तीला साधा सूचक आणि अनुमोदकही मिळू शकला नाही. त्यांना हीच गेल्या ३० वर्षांत केलेल्या कामाची पावती आहे! आम्ही आधीपासून सांगत होतो की, आता राजकीय संन्यास घ्या. लोकांची दिशाभूल करण्याचा आणि नौटंकीचा प्रकार आता जनतेच्या पूर्णपणे लक्षात आला आहे. ३० वर्षांत स्वतःच्या स्वार्थाशिवाय जनतेच्या भल्यासाठी काहीही केलं नाही. जावळी बँकेत एका तरी सामान्य व्यक्तीला बिना पैशाची नोकरी लावली का, हे त्यांनी स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगावं! आज सोसायटीवर स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात त्यांचा पूर्णपणे स्वप्नभंग झाला आहे. ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या शेवटाची सुरुवात आहे!"


संदीप पवार,

उपजिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट), सातारा 



राजकारणातून थेट 'राजकीय संन्यास' घ्यावा!


"स्वतःला सहा गाव पंचक्रोशीतील ऑल-इन-वन आणि स्वयंभू नेता समजणाऱ्या व्यक्तीची हतगेघर सोसायटीच्या निवडणुकीत काय अवस्था झाली आहे, हे आज संपूर्ण जनतेने पाहिलं आहे. ज्या माणसाला स्वतः व्यतिरिक्त १० पैकी ९ लोकांमध्ये साधा एक अनुमोदकही शोधून मिळाला नाही, त्यांनी आता राजकीय आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे! ठराव न मिळाल्यामुळे 'अंगावर पेट्रोल ओतून घेतो, पेटवून घेतो' असा नवीन ड्रामा करून लोकांना आणि प्रशासनाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आता ही नौटंकी आणि हा ड्रामा जनतेच्या पूर्णपणे लक्षात आला आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळेच ते जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत, पण आज मानकुमरे यांची खरी ताकद आणि जनाधार काय आहे हे उघड पडलं आहे. निवडणुकीत लोकांवर दबाव आणणाऱ्या आणि स्टंटबाजी करणाऱ्यांनी आता अशा खालच्या पातळीचे राजकारण सोडून द्यावे आणि राजकारणातून थेट 'राजकीय संन्यास' घ्यावा!"


श्रीहरी गोळे,

माजी जावळी तालुकाध्यक्ष, भाजप





Post a Comment

0 Comments