साताऱ्यात डीजे चालक-
मालकांवर पोलिसांचा दणका
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७ गुन्हे दाखल
सातारा | प्रतिनिधी
सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातारा पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालक आणि साऊंड सिस्टिम मालकांविरोधात कारवाई केली आहे. सातारा शहर पोलीस आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे एकूण ७ गुन्हे दाखल करत ध्वनीप्रदूषण आणि प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सक्षम प्राधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित डीजे चालक व मालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये रोहित बाचल, रोहन गोरे, आरिफ मुलाणी, सूरज दिनकर पवार आणि अभिषेक रवींद्र चव्हाण (साऊंड मालक) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांवर सार्वजनिक प्राधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्यात विवेक सुनील भोसले, प्रतीक सुनील माने आणि सूरज सुधीर सपकाळ या साऊंड मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ (लोकसेवकाने जाहीर केलेल्या आदेशाचे उल्लंघन) आणि २८५ (सार्वजनिक मार्गात अडथळा निर्माण करणे) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी केवळ फौजदारी गुन्हेच दाखल केले नसून संबंधित डीजे चालक व मालकांविरुद्ध ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांनुसार स्वतंत्र कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रस्तावही तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधितांवरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सातारा पोलिसांनी नागरिक, आयोजक आणि डीजे व्यावसायिकांना ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कोणालाही यापुढे पाठीशी घातले जाणार नाही. नियम मोडणाऱ्यांविरुद्ध अशाच प्रकारे कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहील, असा स्पष्ट इशाराही पोलिसांनी दिला आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!