बोगद्याचा राजा :
स्पर्धेपेक्षा उत्सव जपूया!
१९९७ पासून श्रद्धा, सामाजिक जाणीव आणि कार्यकर्त्यांच्या श्रमातून घडतोय सार्वजनिक गणेशोत्सवाचा अनोखा प्रवास
गणेशोत्सव मोठा कशामुळे होतो? मोठ्या खर्चामुळे? भव्य सजावटीमुळे? आकर्षक रोषणाईमुळे?
बोगद्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा १९९७ पासूनचा प्रवास या प्रश्नाचे वेगळे उत्तर देतो— उत्सव मोठा होतो तो पैशाने नव्हे, तर विचारांनी, श्रमांनी आणि माणसांच्या सहभागाने!
सन १९९७ मध्ये सुरू झालेल्या बोगद्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाकडे केवळ धार्मिक उत्सव म्हणून न पाहता, त्याला सामाजिक जाणीव, सर्जनशीलता आणि संस्कृतीची जोड देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. दरवर्षी गणेशमूर्ती आणि देखाव्याच्या माध्यमातून एखादा सामाजिक किंवा सांस्कृतिक विषय समाजासमोर मांडण्याची परंपरा मंडळाने जपली आहे.
“नको घेऊ फाशी, जग राहील उपाशी” या संकल्पनेतून शेतकरी आत्महत्येचा गंभीर प्रश्न मांडण्यात आला. तर “मी देवळात नाही, मी दगडात नाही, मी झाडात आहे” या संदेशातून वृक्षसंवर्धन, झाडे लावा आणि झाडे जगवा, हा पर्यावरणपूरक विचार समाजापर्यंत पोहोचवण्यात आला.
या सर्व संकल्पनांमध्ये एक गोष्ट कायम राहिली. नावीन्य असावे; पण बाप्पांचे पावित्र्य आणि उत्सवाची संस्कृतीही जपली जावी!
यंदाची संकल्पना : द्रौपदी वस्त्रहरण
यंदा मंडळाने महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग गणेशमूर्ती व देखाव्याच्या माध्यमातून साकारला आहे. सभामंडपाच्या मध्यभागी द्रौपदी उभी असून दुःशासन तिची साडी ओढत असल्याचे दृश्य साकारण्यात आले आहे. त्याच क्षणी श्रीकृष्णरूपी गणपती तिच्या रक्षणासाठी अवतरल्याचे दर्शन घडते.
या संकल्पनेचे वैशिष्ट्य केवळ विषयात नसून त्याच्या सादरीकरणातही आहे. सुमारे पाच फूट उंचीची श्रीकृष्णरूपी गणपतीची मूर्ती जमिनीपासून तब्बल १९ फूट उंचीवर हवेत संतुलित स्वरूपात उभारण्यात आली आहे. या रचनेमुळे संपूर्ण प्रसंगाला वास्तवदर्शी परिणाम मिळतो आणि भाविकांना हा प्रसंग जणू डोळ्यांसमोर घडत असल्याचा अनुभव येतो. मात्र, या भव्य रचनेमागील संदेश त्याहून महत्त्वाचा आहे. महाभारतात अन्यायाच्या प्रसंगी श्रीकृष्ण द्रौपदीच्या रक्षणासाठी धावून आले. आजच्या काळात मात्र प्रत्येक अन्यायाच्या वेळी देव अवतार घेऊन येतीलच असे नाही.
मग प्रश्न आहे...
अन्याय होताना आपण कोणाची वाट पाहणार?
आज गरज आहे ती देवरूपी माणसाने माणसाच्या मदतीला धावून जाण्याची.
स्त्रीचा सन्मान, तिची सुरक्षितता आणि अन्यायाविरोधात उभे राहण्याची सामाजिक जबाबदारी हा या संकल्पनेमागील मुख्य विचार आहे. त्याचबरोबर आपल्या इतिहासातील आणि संस्कृतीतील महत्त्वपूर्ण प्रसंग पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत, हा देखील या उपक्रमाचा उद्देश आहे.
उत्सव आमचा… मेहनत आमची!
बोगद्याचा राजा गणेशोत्सव मंडळाची खरी ओळख केवळ भव्य मूर्ती किंवा आकर्षक देखाव्यात नाही; तर तो उत्सव उभा करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या श्रमात आणि एकजुटीत आहे. मूर्तीची निर्मिती असो, मंडप उभारणी असो, सजावट असो किंवा लायटिंग—उत्सवातील अनेक कामे कार्यकर्ते स्वतःच्या हाताने करतात. बाहेरून शक्य तितकी कामे करून घेण्यापेक्षा आपली माणसे, आपली जबाबदारी आणि आपला उत्सव या भावनेतून कार्यकर्ते योगदान देतात. यामुळे खर्चावर नियंत्रण राहते; मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याचा वेळ, श्रम, कौशल्य आणि भावना या उत्सवात मिसळतात.
म्हणूनच हा केवळ तयार केलेला उत्सव नाही....
हा कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हातांनी आणि मनापासून घडवलेला उत्सव आहे!
वर्गणी स्वेच्छेची… उत्सव सर्वांचा..!
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना मंडळाने अनेक वर्षांपासून स्वेच्छेने सहभाग ही भूमिका जपली आहे.
वर्गणीसाठी कोणावरही दबाव टाकला जात नाही. कोणालाही जबरदस्तीने वर्गणी देण्यास सांगितले जात नाही. उत्सवाला राजकीय रंग देण्यापेक्षा सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूप जपण्यावर मंडळाचा भर आहे. लोकांनी आपल्या इच्छेने दिलेली वर्गणी आणि कार्यकर्त्यांनी दिलेला वेळ, श्रम व कौशल्य यांच्या माध्यमातून हा उत्सव उभा राहतो. यामुळे कमी खर्चात, पण मोठ्या सहभागातून उत्सव साजरा करण्याची परंपरा मंडळाने कायम ठेवली आहे.
आधुनिकता स्वीकारूया; पण मुळं जपूया..!
काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत आहे. नवीन तंत्रज्ञान, आधुनिक माध्यमे, आकर्षक प्रकाशयोजना आणि विविध प्रकारची वाद्ये उत्सवाचा भाग बनली आहेत. मंडळ आधुनिकतेचा स्वीकार करते; मात्र त्याच वेळी आपल्या परंपरांचे भानही जपते. आजही विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्याला मंडळ प्राधान्य देते.
कारण....
आधुनिक व्हायचे आहे; पण आपल्या संस्कृतीपासून दूर जायचे नाही.
स्पर्धा नको… उत्सव जपूया!
आज गणेशोत्सवात कुणाचा मंडप मोठा, कुणाची रोषणाई अधिक आकर्षक, कुणाचा देखावा अधिक भव्य, अशी एक अनामिक स्पर्धा निर्माण होताना दिसते. मात्र गणेशोत्सव हा केवळ भव्यतेची किंवा स्पर्धेची बाब नसून तो श्रद्धा, संस्कृती, सामाजिक जाणीव आणि एकोप्याचा उत्सव आहे. म्हणूनच बोगद्याचा राजा मंडळाचा विचार स्पष्ट आहे.
स्पर्धा नको… उत्सव जपूया..!
आज आपण जपत असलेली परंपरा केवळ आजच्या पिढीसाठी नाही. हा सांस्कृतिक ठेवा पुढील पिढीच्या हातात सोपवण्याची जबाबदारीही आपली आहे. पुढच्या पिढीला केवळ मोठे मंडप, मोठी रोषणाई किंवा भव्य देखावे देण्यापेक्षा श्रद्धा, संस्कृती, सामाजिक जाणीव, कार्यकर्त्यांची एकजूट आणि स्वतःच्या हाताने उत्सव उभा करण्याची परंपरा देऊया.
१९९७ पासूनचा प्रवास… विचारांचा आणि श्रमांचा!
१९९७ पासूनचा बोगद्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा प्रवास हा केवळ एका गणेश मंडळाचा प्रवास नाही.
हा प्रवास आहे... श्रद्धेचा… सामाजिक जाणीवेचा…
सर्जनशीलतेचा… परंपरेचा… आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या निस्वार्थ श्रमांचा!
आमच्यासाठी गणेशोत्सव म्हणजे केवळ काही दिवसांची भव्यता नाही. हा असा उत्सव आहे, जिथे मूर्ती विचार सांगते, कार्यकर्ता स्वतःच्या हाताने उत्सव घडवतो, समाज स्वेच्छेने सहभागी होतो आणि परंपरा आधुनिकतेसोबत पुढे जाते.
कारण आमचा विश्वास एकच...
“भव्यता पैशातून उभी राहू शकते; पण उत्सवाची श्रीमंती माणसांच्या श्रमातून, विचारातून आणि भावनेतून निर्माण होते.”
आणि म्हणूनच.....
हा फक्त ‘बोगद्याचा राजा’ नाही… हा कार्यकर्त्यांच्या हातांनी आणि मनाने घडलेला ‘आपला बाप्पा’ आहे!
स्पर्धा नको… उत्सव जपूया!
हा परंपरेचा ठेवा पुढच्या पिढीला देऊया!
गणपती बाप्पा मोरया...!
श्री. प्रतिक मोहिते
मंडळाचा सच्चा कार्यकर्ता
संकलन : श्री. संतोष शिराळे , संपादक

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!