बिभवी शाळेत दंत व मुख आरोग्य शिबिर उत्साहात ; विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व ग्रामस्थांची दंततपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून मुख आरोग्याविषयी मार्गदर्शन

बिभवी शाळेत दंत व मुख 

आरोग्य शिबिर उत्साहात

विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व ग्रामस्थांची दंततपासणी

तज्ज्ञ डॉक्टरांकडून मुख आरोग्याविषयी मार्गदर्शन

मेढा : माणदेश नगरी प्रतिनिधी 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये दंत व मुख आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने बिभवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेत मौखिक आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावचे ज्येष्ठ नागरिक शंकर परिहार यांच्या पुढाकारातून आणि लायन्स क्लब ऑफ ठाणे प्लॅटिनम यांच्या सौजन्याने आयोजित या शिबिराला विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात लायन्स क्लब ऑफ ठाणे प्लॅटिनमचे दंततज्ज्ञ डॉ. उल्हास वाघ (MDS), डॉ. रोचक श्रीवास्तव (BDS) आणि डॉ. सुदेश सुवर्णा (BDS) यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांची दंततपासणी केली. तपासणीनंतर आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी डॉ. उल्हास वाघ यांनी विद्यार्थ्यांना दातांची स्वच्छता, योग्य पद्धतीने दात घासणे, दातांची नियमित निगा राखणे तसेच मौखिक आरोग्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दातांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित दंततपासणीसोबतच दैनंदिन जीवनात योग्य सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून दंततपासणी आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये मौखिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.

कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ ठाणे प्लॅटिनमचे अध्यक्ष राजीव जावळे, संचालक किशोर साखळकर, सचिव स्वाती वाघ, सदस्य शंकर परिहार व रंजना परिहार उपस्थित होते. तसेच बिभवीचे सरपंच संतोष बांदल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप देशमुख, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जाधव, बाजीराव बांदल, नामदेव पुजारी, संगीता परिहार, रंजना मर्ढेकर आणि लक्ष्मी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक अशोक लकडे यांनी लायन्स क्लबचे पदाधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर व उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविकातून त्यांनी शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. अमिता एरंडे यांनी आभार मानले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश दिघे, दिपाली दुंदळे, सुरेखा पवार, स्नेहल देशमुख आणि सुमल बांदल यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना दर्जेदार दंततपासणी व आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी लायन्स क्लब ऑफ ठाणे प्लॅटिनम, डॉ. उल्हास वाघ आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांचे आभार मानले. 





Post a Comment

0 Comments