प्रति पंढरपूर करहर येथे
आषाढी एकादशीनिमित्त
भक्तीभावात शासकीय महापूजा
ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची पूजा
जनतेच्या सुख-समृद्धीसाठी विठ्ठलचरणी साकडे
संतोष शिराळे | प्रति पंढरपूर करहर
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या करहर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा करण्यात आली.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळली होती. टाळ-मृदुंगाचा निनाद, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण करहर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
महापूजेनंतर ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विठ्ठल-रुक्मिणी चरणी राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, शेतकऱ्यांच्या भरभराटी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. तसेच राज्यातील तमाम वारकरी, विठ्ठलभक्त आणि नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी करहर येथील तीन वारकरी दाम्पत्यांनाही विठ्ठल पूजेचा मान देण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मा. आमदार शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती वसंतराव मानकुमरे, प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, विविध मान्यवर, मंदिराचे पुजारी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
महापूजेनंतर भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. टाळ-मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि वारकऱ्यांच्या जयघोषाने संपूर्ण करहर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. आषाढी एकादशी वारी सोहळ्यानिमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बेलोशी येथील दत्तात्रय कळंबे महाराज समाधी मंदिरातून संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे पादुकांचे प्रस्थान झाले. काटवली येथे पंचपदी व माऊलीच्या अश्वाचे पूजन, त्यानंतर मानाच्या पालख्यांचे स्वागत आणि विविध संतांच्या दिंड्यांचे प्रस्थान झाले. महू धरण परिसरात दुपारी १२ वा. भव्य गोल रिंगण पार पडणार आहे. त्यानंतर वारकरी फुगडी, प्रसाद वाटप आणि प्रति पंढरपूर करहर कडे मार्गक्रमण होणार आहे.
दुपारनंतर करहर परिसरात वारकरी संप्रदायातील दिंड्यांचे आगमन सुरू होणार आहे. काटवली-बेलोशी परिसरातून, कुडाळ-बामणोली भागातून तसेच करंडी-इंदवली परिसरातून येणाऱ्या संतांच्या दिंड्या सायंकाळी चार वाजेपर्यंत करहर येथे दाखल होणार आहेत. करहर ग्रामस्थांच्या वतीने सर्व दिंड्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार असून, संतांच्या पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
दिंड्यांच्या स्वागतानंतर करहर नगरीत वारकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य रिंगण सोहळा रंगणार आहे. टाळ, मृदुंग, वीणा, अभंग आणि हरिनामाच्या अखंड गजरात हा सोहळा पार पडणार असून, परिसरातील हजारो भाविक या भक्तिमय सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने करहर नगरी पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाच्या भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाने उजळून निघाली आहे.








0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!