साताऱ्यात अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी व डिजिटल फॉरेन्सिक्स प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाच्या करिअरची नवी संधी छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संस्थेचा उपक्रम EC-Council मान्यताप्राप्त प्रशिक्षण

साताऱ्यात अत्याधुनिक

सायबर सिक्युरिटी व 

डिजिटल फॉरेन्सिक्स 

प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाच्या करिअरची नवी संधी

छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संस्थेचा उपक्रम

EC-Council मान्यताप्राप्त प्रशिक्षण

सातारा | प्रतिनिधी

डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने सातारा शहरात छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संस्थेच्या 'Skyline Centre of Excellence in Cyber Security and Forensics' या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, डिजिटल फॉरेन्सिक्स आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध होणार असून, रोजगार आणि करिअरच्या नव्या संधींचे दालन खुले होणार आहे.

प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते झाले. यावेळी लेफ्टनंट कर्नल डॉ. संतोष खडसरे (निवृत्त), संचालक – iDEFENCE Innovations Pvt. Ltd. हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या केंद्रात Ethical Hacking, Cyber Security, Digital Forensics, Computer Hacking Forensics Investigation (CHFI), Networking, Linux, Fingerprint Examination, Questioned Document Analysis तसेच अत्याधुनिक डिजिटल फॉरेन्सिक साधनांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, प्रयोगशाळा आधारित प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

हे केंद्र EC-Council Accredited Training Centre म्हणून कार्यरत असून, विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र परीक्षांसाठी आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि करिअर काउन्सेलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सायबर सुरक्षेचे वाढते महत्त्व अधोरेखित करत, साताऱ्यात अशा प्रकारचे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण मिळून देश-विदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रमुख पाहुणे ले. कर्नल डॉ. संतोष खडसरे यांनी भविष्यात सायबर वॉरफेअर, डिजिटल संरक्षण आणि माहिती सुरक्षेच्या क्षेत्रात प्रशिक्षित तज्ज्ञांची मोठी गरज निर्माण होणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानातील बदल स्वीकारत कौशल्य विकास, संशोधन आणि नैतिक सायबर सुरक्षा क्षेत्रात प्राविण्य मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्राच्या संचालिका संगीता रविंद्र चिखले यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करून भविष्यातील तांत्रिक आव्हानांचा सामना करण्यास सक्षम बनविणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगितले. तर केंद्रप्रमुख जान्हवी भद्रे यांनी अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा, डिजिटल फॉरेन्सिक सुविधा, अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची माहिती दिली. सायबर सुरक्षा आणि डिजिटल फॉरेन्सिक्स क्षेत्रातील कुशल तज्ज्ञ घडविण्याच्या दिशेने सुरू झालेले हे प्रशिक्षण केंद्र सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार असून, या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.

Post a Comment

0 Comments