जावळी तालुक्याचा नावलौकिक करणारी कावडीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. (छाया : अजित जगताप)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
विभागस्तरीय मूल्यमापनासाठी
साताऱ्यातील
कावडी, मान्याचीवाडी
ग्रामपंचायतींची निवड
राज्यस्तरीय पुरस्काराच्या दिशेने दमदार वाटचाल
२२ जुलै रोजी दोन्ही ग्रामपंचायतींची पाहणी
सातारा/करहर | प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पुणे विभागस्तरीय पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यातील कावडी (ता. जावळी) आणि मान्याचीवाडी (ता. पाटण) या दोन ग्रामपंचायतींची विभागस्तरीय मूल्यमापनासाठी निवड झाली आहे. बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी या दोन्ही ग्रामपंचायतींची सविस्तर पाहणी होणार असून, या स्पर्धेत यश मिळाल्यास राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्यांची निवड होणार आहे.
यापूर्वी सातारा जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींचे तालुकास्तरावर मूल्यमापन करण्यात आले होते. त्यामधून उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे कावडी आणि मान्याचीवाडी या ग्रामपंचायतींची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या दोन्ही ग्रामपंचायतींच्या कामगिरीकडे लागले आहे.
पुणे विभागातील जिल्हा परिषदांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर श्री. विजय मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय मूल्यमापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार ग्रामपंचायतींच्या विकासकामांची, प्रशासनातील पारदर्शकतेची, लोकसहभागाची, स्वच्छता, डिजिटल सेवा, महसूल निर्मिती, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन तसेच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची सखोल पडताळणी करणार आहे.
मूल्यमापन सुरळीत पार पडावे यासाठी गट विकास अधिकारी, पंचायत समिती जावळी व पाटण यांना सर्व आवश्यक तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अभियानाशी संबंधित सर्व अभिलेखे, कागदपत्रे, विकासकामांचे पुरावे आणि प्रत्यक्ष पाहणीसाठी आवश्यक व्यवस्था संबंधित ग्रामपंचायतींनी पूर्ण ठेवावी, तसेच सर्व विभागांचे तालुका व जिल्हास्तरीय अधिकारी तपासणीच्या दिवशी उपस्थित राहून समितीला आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कावडी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या मालकीचे उपहारगृह उभारून महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामविकासातील नाविन्यपूर्ण उपक्रम, आर्थिक स्वावलंबन आणि लोकसहभागामुळे कावडी ग्रामपंचायतीचा नावलौकिक राज्यभर पोहोचला आहे. या यशामागे जिल्हा परिषद सदस्य तथा कावडी गावचे सुपुत्र वसंतराव मानकुमरे, ॲड. बापूसाहेब मानकुमरे तसेच ग्रामस्थांचे विशेष योगदान असल्याचे मानले जाते.
विभागस्तरीय मूल्यमापनात कावडी आणि मान्याचीवाडी या दोन्ही ग्रामपंचायती उत्कृष्ट कामगिरी करून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र ठराव्यात, अशा शुभेच्छा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, उद्योजक हनुमंत रांजणे, ॲड. विलास वहागावकर तसेच जावळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या आहेत.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!