धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा लोकशाहीचा मोठा विजय; विद्यार्थी शक्ती आणि विरोधकांच्या एकजुटीचा यशस्वी लढा : पृथ्वीराज चव्हाण

 


धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा

हा लोकशाहीचा मोठा

विजय : पृथ्वीराज चव्हाण

विद्यार्थी शक्ती आणि विरोधकांच्या एकजुटीचा यशस्वी लढा

सातारा | प्रतिनिधी 

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याला "लोकशाहीचा मोठा विजय" असे संबोधले. देशभरातील विद्यार्थी, युवक, पालक आणि विरोधी पक्षांनी सातत्याने उभारलेल्या आंदोलनाचे हे यश असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे लोकशाहीचा प्रचंड मोठा विजय आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो स्वीकारला आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तसेच शिक्षण खात्याची जबाबदारी पुढे कोणाकडे सोपविण्यात येणार आहे, याबाबतही अधिकृत घोषणा झालेली नाही."

ते पुढे म्हणाले की, NEET आणि CBSE संदर्भातील प्रश्नांवर देशभरातील विद्यार्थी, युवक आणि पालकांनी सातत्याने आवाज उठवला. विरोधी पक्षांनीही या प्रश्नावर एकजुटीने भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे हा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नसून विद्यार्थी शक्ती, युवा शक्ती आणि विरोधी पक्षांच्या एकजुटीचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले.

या घडामोडीचे वर्णन एका वाक्यात करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी "Beginning is the End" (हीच अखेरची सुरुवात आहे) असे म्हटले. या निर्णयामुळे शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्व अधिक मजबूत होईल आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारला अधिक गांभीर्याने पाहावे लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला असून, NEET-UG परीक्षेतील वाद आणि त्यानंतर देशभरात झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.


Post a Comment

0 Comments