खंडाळ्यात ८० ग्रॅम गांजासह
७.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त,
एक जणाला अटक
पोलिसांची धडाकेबाज कारवाई
खंडाळा | प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात अवैध अमली पदार्थांविरोधात कारवाई करत खंडाळा पोलिसांनी ८० ग्रॅम गांजा बाळगणाऱ्या एका संशयिताला अटक केली आहे. या कारवाईत ८० ग्रॅम गांजा, २.६२ लाखांची रोख रक्कम आणि ५ लाख किमतीची टाटा अल्ट्रॉज कार असा एकूण ₹७ लाख ६२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक महेंद्र जे. जगताप यांना गोपनीय माहिती मिळाली की, जुना टोलनाका, खंडाळा येथील मदिरा बिअर शॉपीजवळ एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या टाटा अल्ट्रॉज कारमध्ये गांजा बाळगून बसली आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने शासकीय पंच व छायाचित्रकार यांच्या उपस्थितीत घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी संबंधित वाहन नवीन पुलाखाली आणून संशयिताची चौकशी केली असता त्याने आपले नाव सचिन अनिल इंद्रेकर (वय ४४, व्यवसाय – चालक, रा. कांदळी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे सांगितले. त्यानंतर त्याची अंगझडती आणि वाहनाची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून हिरवट-काळ्या रंगाचा, उग्र वासाचा ८० ग्रॅम ओलसर गांजा, २ लाख ६२ हजार १०० रुपयांची रोख रक्कम तसेच ५ लाख किमतीची पांढऱ्या रंगाची टाटा अल्ट्रॉज कार असा एकूण ७ लाख ६२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३६/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २८ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सातारा जिल्ह्यात अवैध अमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (फलटण विभाग) धन्यकुमार गोडसे यांनी दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जे. जगताप यांच्या नेतृत्वाखाली शरद तांबे, दत्ता दिघे, अमित चव्हाण, धिरज नेवसे, हनुमंत गिते आणि श्रीकांत भोसले यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!