प्रति पंढरपूर करहर येथे
आषाढी एकादशी यात्रा
भक्तिमय वातावरणात सुरू
शासकीय महापूजेला आ. शशिकांत शिंदे सपत्नीक उपस्थित
संतोष शिराळे | प्रति पंढरपूर करहर
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जावळी तालुक्यातील 'प्रति पंढरपूर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र करहर येथे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. या महापूजेस राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री तथा माजी आमदार शशिकांत शिंदे हे सपत्नीक उपस्थित राहिले. त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पूजन करून दर्शन घेत विठ्ठल चरणी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
यावेळी "तुका म्हणे माझे सर्वही साचले । विठ्ठल पाहिले डोळां आम्ही ।।" या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळींनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. टाळ-मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि वारकऱ्यांच्या अखंड नामस्मरणाने करहर नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
शासकीय महापूजेनंतर शशिकांत शिंदे यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, वारकरी आणि सर्व नागरिकांवर विठ्ठल-रुक्मिणीची कृपादृष्टी कायम राहो, सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, समृद्धी आणि आरोग्य नांदो, अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठल चरणी केली.
या प्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, उपसभापती गोरख महाडिक, जावली पंचायत समितीचे शिवसेनेचे गटनेते आतिश कदम, उद्योजक विठ्ठल गोळे, तालुका शिवसेना अध्यक्ष समीर गोळे, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, श्री क्षेत्र करहरचे नागरिक, वारकरी बांधव तसेच भाविक उपस्थित होते.
आषाढी एकादशीनिमित्ताने करहर येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, संतांच्या दिंड्यांचे आगमन, भजन-कीर्तन आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडत असून, संपूर्ण परिसर विठ्ठलमय वातावरणाने भारावून गेला आहे.






0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!