साताऱ्यात जिल्हास्तरीय
तृतीयपंथीय सक्षमीकरण
शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
शासनाच्या विविध योजनांची माहिती व कायदेशीर हक्कांबाबत मार्गदर्शन
सातारा | प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तृतीयपंथीय व्यक्ती सक्षमीकरण शिबिराला जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र, राजपथ, सातारा येथे पार पडलेल्या या शिबिरात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांसह आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार, अन्न सुरक्षा, कायदेशीर संरक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात सहभागी झालेल्या तृतीयपंथीय व्यक्तींनी विविध शासकीय विभागांकडून एकाच ठिकाणी योजनांची माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आरोग्य, शिक्षण, रोजगार, अन्न सुरक्षा, कौशल्य विकास आणि कायदेशीर हक्कांविषयी सविस्तर माहिती मिळाल्याने अशा प्रकारची सक्षमीकरण शिबिरे नियमितपणे आयोजित करावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शिबिरादरम्यान विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनांची माहिती दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत स्वतंत्र शिधापत्रिका आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून तृतीयपंथीय व्यक्तींचे कायदेशीर हक्क, सर्वोच्च न्यायालयाच्या NALSA निर्णयासह ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम, २०१९ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त (कामगार) कार्यालयाने ई-श्रम कार्ड, कामगार नोंदणी व कामगार कल्याण योजनांची माहिती दिली. शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती आणि शिक्षणातील समान संधींबाबत, तर जिल्हा उद्योग केंद्राने स्वयंरोजगार, उद्योजकता विकास आणि आर्थिक सहाय्य योजनांची माहिती दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी तृतीयपंथीय व्यक्तींना संविधानाने दिलेल्या समान हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ तृतीयपंथीय व्यक्तींपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी तृतीयपंथीय व्यक्तींवरील हिंसाचार, छळ, लैंगिक अत्याचार आणि भेदभावाविरोधातील कायदेशीर संरक्षण, तक्रार निवारण यंत्रणा तसेच पोलिस विभागाच्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक आयुक्त, समाज कल्याण सुनील जाधव यांनी भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची हमी दिली असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या तृतीयपंथीय धोरण-२०२४ तसेच ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियमांतर्गत तृतीयपंथीय व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण करणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिबिरार्थींनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. विविध कलागुणांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील श्रुती रकटे, सुवर्णा साळवे, विकास गायकवाड, मनीषा सावंत, समतादूत तसेच इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!