सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेले मान्यवर. (छाया : अजित जगताप, सातारा)
सातारा जिल्हा प्राथमिक
शिक्षक बँकेची ७९ वी
वार्षिक सभा शांततेत
८.६५% व्याजदराने २० लाखांपर्यंत कर्जयोजना जाहीर
संतोष शिराळे, सातारा |
सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष विजय ढमाळ यांच्या अध्यक्षतेखाली शांत, शिस्तबद्ध आणि सहकार क्षेत्राला साजेशा वातावरणात पार पडली. पूर्वी वादग्रस्त ठरणाऱ्या सभांपेक्षा यंदाची सभा आदर्शवत झाल्याने सभासदांनी संचालक मंडळाच्या कामकाजाचे स्वागत केले.
सभेत निष्क्रिय सभासदांना पुन्हा बँकेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष कर्जयोजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत ८.६५ टक्के व्याजदराने २० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, १५ जुलैपर्यंत सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
बँकेच्या आर्थिक प्रगतीची माहिती देताना, गेल्या वर्षाच्या तुलनेत ठेवीत ३५.७१ कोटी, कर्जवाटपात ३०.५७ कोटी आणि गुंतवणुकीत १६.४१ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे सांगण्यात आले. ३१ मार्चअखेर बँकेच्या ठेवी ७३५ कोटी, कर्जे ४८९ कोटी, भांडवली गुंतवणूक ३२४ कोटी तर खेळते भांडवल ८६४ कोटी रुपये इतके झाले आहे. बँकेमार्फत दिवंगत सभासदांच्या वारसांना ३ कोटी ३० लाख रुपयांची आर्थिक मदत, तसेच १५२ सभासदांना आजारपणासाठी १४ लाख ७७ हजार रुपयांची मदत देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
उपाध्यक्ष नितीन फरांदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब भोसले यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य आणि माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्राथमिक शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते दीपक भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सभेला संचालक किरण यादव, नितीन काळे, ज्ञानोबा ढापरे, विशाल कणसे, पुष्पलता बोबडे, निशा मुळे, महेंद्र जानुगडे, नितीन राजे, तानाजी कुंभार, विजय शिर्के, संजय संकपाळ, शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, नितीन शिर्के, सुरेश पवार, नवनाथ जाधव, शहाजी खाडे, संजीवन जगदाळे, विजय बनसोडे आणि तज्ञ संचालक अमित निकम व बँकेचे माजी पदाधिकारी सिद्धेश्वर पुस्तके, उदय शिंदे, मारुती खाडे, अनिल जायकल मच्छिंद्र मुळीक मिलन मुळे, लावंड बापू, मायेनकर गुरुजी, विश्वंभर रणवरे, विजयकुमार भुजबळ, अंकुश नांगरे, देशमाने, अगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते,
तसेच या सभेला कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे धनसिंग सोनवणे, बाजीराव शेटे, प्रशांत मोरे, उदय भंडारे यांनी प्राथमिक शिक्षक बँकेच्या घडामोडीबाबत काही प्रश्न उपस्थित करून प्राथमिक शिक्षक बँकेच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली. त्यावर संचालक मंडळाने समाधानकारक उत्तरे दिली.
एकेकाळी पोलीस बंदोबस्तात होणाऱ्या या सभेने आता शिस्त, पारदर्शकता आणि सहकार्याचा आदर्श निर्माण केल्याची भावना अनेक सभासदांनी व्यक्त केली.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!