स्वच्छ, सुरक्षित, आरोग्यदायी व आनंददायी वारीसाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज; लाखो वारकऱ्यांसाठी व्यापक नियोजन : जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांची माहिती

स्वच्छ, सुरक्षित, आरोग्यदायी व

आनंददायी वारीसाठी 

सातारा जिल्हा परिषद सज्ज

लाखो वारकऱ्यांसाठी व्यापक नियोजन

जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांची माहिती

संतोष शिराळे | सातारा

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा २०२६-२७ निमित्त सातारा जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित, आरोग्यदायी आणि आनंददायी वारीचा अनुभव मिळावा, यासाठी जिल्हा परिषद सातारा, जिल्हा प्रशासन आणि सर्व संबंधित शासकीय विभागांनी व्यापक नियोजन पूर्ण केले असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी दिली.

यंदाचा पालखी सोहळा १५ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. १५ जुलै रोजी पिंपरे खुर्द येथे सकाळचा विसावा, निरा येथे दुपारचा विसावा आणि लोणंद येथे मुक्काम होणार आहे. १६ जुलै रोजी लोणंद येथून प्रसिद्ध "चांदोबाचा लिंब" येथील पहिले उभे रिंगण पार करून पालखी तरडगाव येथे मुक्कामी पोहोचेल. १७ जुलै रोजी काळज येथील दत्त मंदिर व सुरवडी येथे सकाळचे विसावे, वडजल येथे दुपारचा विसावा आणि फलटण येथे मुक्काम असेल. १८ जुलै रोजी विडणी येथे सकाळचा विसावा, निंबळक फाटा येथे दुपारचा विसावा घेऊन पालखीचा मुक्काम बरड येथे होणार आहे.

वारकऱ्यांच्या निवासासाठी लोणंद, तरडगाव, वरवंड, सुरवडी, फलटण, वडशिंगण आणि बरड पालखी तळ येथे एकूण ६ ठिकाणी २५ ते ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे जर्मन हँगर टेंट उभारण्यात येणार आहेत. या टेंटमध्ये सुमारे ४ ते ५ हजार वारकऱ्यांची मुक्काम व्यवस्था करण्यात येणार असून आरोग्य कक्ष, हिरकणी कक्ष, स्वयंसेवकांकडून चरणसेवा, फूट मसाज, शौचालये, स्वच्छ पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध असतील. तसेच पाडेगाव, वडजल, विडणी, निंबळक फाटा आणि पिंपरे येथे वॉटर प्रूफ मंडप उभारले जाणार आहेत.

वारीदरम्यान पिण्याच्या पाण्याचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ४० शासकीय, ६५ खाजगी आणि दिंडीतील ५०८ टँकरचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय ६२ खाजगी जलस्रोत निश्चित करण्यात आले असून प्रत्येक विसावा व मुक्कामस्थळी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेतली जाणार आहे.

स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देत पालखी मार्गावरील प्रत्येक मुक्कामस्थळी ९,८०० तात्पुरत्या शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. मैल्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी नवीन आरसीसी सेप्टिक टँक उभारण्यात आले असून २८ ठिकाणी पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र ३२३ स्नानगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.

आरोग्य सुविधांसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. ७९० वैद्यकीय व आरोग्य कर्मचारी, १०८ रुग्णवाहिका, ४६ फिरते वैद्यकीय पथके, ५० फिरते आरोग्यदूत, १०२ क्रमांकाच्या अॅम्ब्युलन्स सेवा तसेच गर्दीच्या ठिकाणी ७ मेडिकल ऑन व्हील्स कार्यरत राहणार आहेत. विविध वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांमधील १,१०८ स्वयंसेवक चरणसेवा व आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये सहभागी होणार असून ६०० मेडिकल किट उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. महिला व बालकांसाठी १७ हिरकणी कक्ष तसेच सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.वारकऱ्यांच्या सोयीसाठी ८ मोबाईल चार्जिंग व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालखी मार्गावरील रस्ते व पायाभूत सुविधांसाठी २०.८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून खंडाळा व फलटण तालुक्यातील २४ रस्ते व पुलांची दुरुस्ती, नदीघाट बांधकाम, आरसीसी गटारे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, संरक्षण भिंती, पालखी तळाकडे जाणाऱ्या रस्त्यांची सुधारणा, पालखी तळांचे विस्तारीकरण, मुरमीकरण व विद्युतीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत.

वारकऱ्यांसोबत असणाऱ्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथे पशुवैद्यकीय पथके व दवाखाने सज्ज ठेवण्यात आले आहेत.


"आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अमूल्य वारसा आहे. लाखो वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, निवारा आणि सुरक्षिततेचे अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. प्रशासनाला सहकार्य करून स्वच्छ, सुरक्षित व आनंददायी वारी घडवून आणण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा."

- डॉ. प्रिया शिंदे, अध्यक्षा, जिल्हा परिषद सातारा 

Post a Comment

0 Comments