झेडपी अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे खेळल्या प्रति पंढरपूरमध्ये वारकऱ्यांसोबत फुगडी आषाढी एकादशीनिमित्त लुटला भक्तीचा आगळावेगळा आनंद

करहर : आषाढी एकादशीच्या रिंगण सोहळ्यात वारकरी महिलांबरोबर फुगडीचा आनंद घेताना जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे.

झेडपी अध्यक्षा प्रिया शिंदे 

खेळल्या प्रति पंढरपूरमध्ये

वारकऱ्यांसोबत फुगडी

आषाढी एकादशीनिमित्त लुटला भक्तीचा आगळावेगळा आनंद

करहर | प्रतिनिधी 

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद म्हटलं की प्रशासकीय जबाबदाऱ्या, बैठकांचा धबडगा आणि औपचारिकतेचा एक प्रोटोकॉल आलाच. परंतु, विठ्ठलनामाचा गजर, मृदंगाचा निनाद आणि टाळांचा कडकडाट जिथे घुमतो, तिथे पदाचे वजन आपोआप गळून पडते. जावली तालुक्यातील 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करहर येथे आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर असाच एक नयनरम्य आणि भक्तीरसपूर्ण सोहळा अनुभवायला मिळाला.

जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा आणि प्रोटोकॉल बाजूला ठेवून, वारीत सर्वसामान्य महिला-पुरुष वारकऱ्यांसोबत देहभान हरपून फुगड्या खेळत भक्तीचा एक आगळावेगळा आनंद लुटला.

आषाढी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर करहर नगरीत पंचक्रोशीतून हजारो वारकरी आणि दिंड्या दाखल झाल्या होत्या. 'ज्ञानोबा माऊली तुकाराम', 'जय हरी विठ्ठल' आणि 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल'च्या जयघोषाने संपूर्ण करहर परिसर विठ्ठलमय झाला होता. दुपारच्या सुमारास गोल आणि उभे रिंगण पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. टाळांच्या तालावर आणि अभंग-भजनाच्या धूनवर वारकरी पूर्णपणे तल्लीन झाले होते.

या भक्तिमय वातावरणात सहभागी झालेल्या डॉ. प्रिया शिंदे यांनाही वारकऱ्यांचा हा उत्साह पाहून स्वतःला रोखता आले नाही. त्यांनी थेट वारकरी महिलांच्या रिंगणात प्रवेश केला. सर्वसामान्य महिलांशी हातात हात घालून, रिंगणात तालावर गिरक्या घेत त्यांनी फुगड्या खेळल्या. एका जिल्ह्याचा कारभार हाकणाऱ्या सर्वोच्च पदावरील लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे आपल्यात मिसळून फुगडी खेळताना पाहून उपस्थित वारकरी आणि महिला भाविक भारावून गेल्या.

माणूस पदाने आणि प्रतिष्ठेने कितीही मोठा झाला, तरी भगवंताच्या दरबारात तो एक सामान्य भक्तच असतो, याची प्रचिती डॉ. प्रिया शिंदे यांच्या या कृतीतून आली. पदाचा कोणताही अहंपणा अथवा दंभ न बाळगता, रयतेतील आणि जनतेतील एक घटक बनून त्यांनी साधलेला हा संवाद उपस्थितांच्या मनाला शिवून गेला. अध्यक्षांच्या या साधेपणामुळे आणि भक्तिभावामुळे यंदाची करहरची आषाढी एकादशी वारी सर्वच भाविकांसाठी विशेष आणि स्मरणीय ठरली.

Post a Comment

0 Comments