पाऊस कोसळत राहिला... हरिनाम दुमदुमत राहिला; फलटणमध्ये माऊलींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत ; ज्ञानोबा-तुकाराम'च्या अखंड गजरात लाखो वारकऱ्यांची भक्तिमय उपस्थिती

पाऊस कोसळत राहिला...

हरिनाम दुमदुमत राहिला..!

फलटणमध्ये माऊलींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत

ज्ञानोबा-तुकाराम'च्या अखंड गजरात लाखो वारकऱ्यांची भक्तिमय उपस्थिती

संतोष शिराळे | फलटण


संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे फलटण नगरीत शुक्रवारी मुसळधार पावसातही जल्लोषपूर्ण आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. पावसाची पर्वा न करता लाखो वारकरी "ज्ञानोबा माऊली... तुकाराम", "विठ्ठल... विठ्ठल" आणि "माऊली... माऊली" च्या अखंड जयघोषात तल्लीन झाले होते. भर पावसातही वारकऱ्यांचा उत्साह कायम असल्याचे चित्र संपूर्ण शहरात पाहायला मिळाले.



पालखीचे आगमन होताच टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि अभंगांच्या सुरांनी फलटण नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. भगव्या पताकांचा सागर, हरिनामाच्या गजरात नाचणारे वारकरी आणि माऊलींच्या दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी फुलांची उधळण करून पालखीचे मनोभावे स्वागत केले.



फलटण शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांनी वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार, वैद्यकीय सेवा तसेच इतर आवश्यक सुविधांची उत्कृष्ट व्यवस्था केली होती. शहरभर उभारलेल्या स्वागत कमानी, आकर्षक रांगोळ्या आणि विद्युत रोषणाईमुळे पालखी सोहळ्याचे वैभव अधिक खुलून दिसत होते.


पालखीच्या आगमनानंतर दिंड्यांचा फलटणमध्ये मुक्काम झाला. वारकऱ्यांनी हरिनाम सप्ताह, अभंग, भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीचा अविस्मरणीय सोहळा अनुभवला. मुसळधार पाऊस सुरू असतानाही वारकऱ्यांच्या भक्ती आणि उत्साहात कोणतीही कमी जाणवली नाही.


श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा केवळ धार्मिक परंपरा नसून समाजातील ऐक्य, समता, सेवा आणि भक्तीचा संदेश देणारा सोहळा असल्याचे चित्र यंदाही फलटण नगरीत प्रकर्षाने पाहायला मिळाले.

Post a Comment

0 Comments