टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने
महिंद्रा थार लंपास करणारा
सोलापुरातील आरोपी अटकेत
सातारा व चाकणमधील दोन गुन्ह्यांची उकल
सातारा | प्रतिनिधी
महिंद्रा कंपनीची थार चारचाकी खरेदी करण्याचे सांगून टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने वाहन घेऊन पसार होणाऱ्या सोलापुरातील एका सराईत फसवणूक करणाऱ्या आरोपीला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकाने अटक केली आहे. या कारवाईत एकूण ३२ लाख किंमतीची दोन महिंद्रा थार वाहने जप्त करण्यात आली असून सातारा शहर पोलीस ठाणे आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अशा स्वरूपाच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सोहेल अफजल बागवान (वय २८, व्यवसाय – मजुरी, मूळ रा. जुनी पेठ, पंढरपूर, सध्या रा. जामखंडी पूल, बुधवार पेठ, सोलापूर) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै २०२६ रोजी सातारा शहरातील महिंद्रा शोरूममध्ये एक अनोळखी इसम थार वाहन खरेदी करण्याच्या उद्देशाने आला होता. त्याने वाहनाची टेस्ट ड्राइव्ह करण्याची इच्छा व्यक्त करून शोरूममधून थार वाहन ताब्यात घेतले. मात्र टेस्ट ड्राइव्हनंतर वाहन परत न आणता तो फरार झाला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या.
यानंतर डीबी पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत आरोपीच्या हालचालींचा मागोवा सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपी वाहन घेऊन पुण्याच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख निश्चित करून त्याचा शोध सुरू ठेवला.
तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार डीबी पथकाने सोलापूर शहरात सापळा रचून सोहेल अफजल बागवान याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने सातारा शहरातील गुन्ह्याची कबुली दिली. तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण पोलीस ठाण्याच्या परिसरातही याच पद्धतीने महिंद्रा थार खरेदी करण्याचा बहाणा करून टेस्ट ड्राइव्हच्या नावाखाली वाहन घेऊन फसवणूक केल्याची कबुली दिली.
आरोपीच्या कबुलीजबाबानुसार पोलिसांनी एकूण ३२ लाख किंमतीची दोन महिंद्रा थार वाहने जप्त केली असून दोन्ही वाहने तपासासाठी ताब्यात घेण्यात आली आहेत. या कारवाईमुळे दोन गुन्ह्यांची उकल झाली असून आरोपीने अन्य ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सातारा शहर पोलीस करीत आहेत.
या प्रकरणानंतर सातारा शहर पोलिसांनी नागरिक, वाहन विक्रेते आणि शोरूम चालकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. वाहन विक्री किंवा टेस्ट ड्राइव्हसाठी वाहन देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची ओळख, आवश्यक कागदपत्रे, मोबाईल क्रमांक, पत्ता आणि इतर माहितीची काटेकोर पडताळणी करावी. कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांच्यासह निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, वैभव माने, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, सचिन आदमाने, आशिकेष डोळस तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!