अनेकांचे जीव वाचवणारे 'देवदूत' दादा पाटील आज देतायेत कॅन्सरशी झुंज; मदतीसाठी समाजाला भावनिक साद; विद्यार्थ्यांना दिला आधार, अपघातग्रस्तांसाठी धावले; आता उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज

अनेकांचे जीव वाचवणारे 

'देवदूत' दादा पाटील 

आज देतायेत कॅन्सरशी झुंज

मदतीसाठी समाजाला भावनिक साद

विद्यार्थ्यांना दिला आधार,अपघातग्रस्तांसाठी धावले

आता उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज

सातारा | प्रतिनिधी

सातारा तालुक्यातील लिंब गावचे सुपुत्र व समाजसेवक मुरलीधर लालासो सावंत (दादा पाटील) हे नाव परिसरात निस्वार्थ सेवेसाठी आदराने घेतले जाते. दुसऱ्यांच्या अडचणीला स्वतःची अडचण समजून आयुष्यभर मदतीचा हात देणारे दादा पाटील आज स्वतः कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी जीवन-मरणाची झुंज देत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू असलेल्या उपचारांमुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, समाजाकडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

दादा पाटील यांनी समाजसेवेलाच जीवनाचे ध्येय मानले. घराजवळील गौरीशंकर महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःच्या घरी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून दिली. अनेक विद्यार्थ्यांसाठी ते केवळ मदतनीस नव्हते, तर पालकाची भूमिकाही त्यांनी निभावली.

रायगाव फाटा ते लिंबखिंड राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी सर्वप्रथम धाव घेणारे नाव म्हणजे दादा पाटील. पोलिसांच्या सहकार्याने त्यांनी अनेक जखमींना वेळेत रुग्णालयात पोहोचवून जीवदान दिले. तसेच अपघातस्थळी सापडलेल्या मोबाईल, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू प्रामाणिकपणे त्यांच्या मालकांकडे परत करून त्यांनी प्रामाणिकपणा आणि सेवाभावाचा आदर्श घालून दिला. त्यामुळे परिसरात त्यांची ओळख "देवदूत" म्हणून निर्माण झाली.

मात्र, आज नियतीने याच सेवाभावी व्यक्तीची कठोर परीक्षा घेतली आहे. कॅन्सरवरील उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून, शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबाचे उत्पन्नही ठप्प झाले आहे. घरातील कर्ता पुरुष अंथरुणाला खिळल्याने दैनंदिन खर्च आणि उपचाराचा भार पेलणे कुटुंबासाठी अशक्यप्राय झाले आहे.

आजवर अनेकांच्या मदतीला धावून गेलेल्या दादा पाटील यांच्या मदतीसाठी आता समाजाने पुढे यावे, अशी भावनिक विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी आपल्या परीने आर्थिक मदतीचा हातभार लावून या कुटुंबाला आधार द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मदतीसाठी संपर्क :

📞 मोबाईल : 7387295708


📲 QR कोडद्वारेही आर्थिक मदत स्वीकारली जात आहे.

Post a Comment

0 Comments