ओबीसी सेल आता जनतेच्या सेवेत! दर सोमवारी राष्ट्रवादी भवनात जिल्हाध्यक्ष अनिल लोहार नागरिकांच्या भेटीस; शासकीय कामे, आरक्षण व योजनांसाठी मार्गदर्शन

ओबीसी सेल आता

जनतेच्या सेवेत..!


दर सोमवारी राष्ट्रवादी भवनात जिल्हाध्यक्ष अनिल लोहार नागरिकांच्या भेटीस


शासकीय कामे, आरक्षण व योजनांसाठी मार्गदर्शन

संतोष शिराळे| सातारा

ओबीसी समाजासह सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय अडचणी, प्रलंबित कामे, विविध योजनांचा लाभ तसेच आरक्षणाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने साताऱ्यात एक लोकाभिमुख उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सोमवार, १३ जुलै २०२६ पासून दर सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत राष्ट्रवादी भवन, सातारा येथे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल मारुती लोहार नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत.

हा उपक्रम प्रांताध्यक्ष मा. आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हाध्यक्ष मा. आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असून, ओबीसी समाजातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या प्रश्नांसाठी विश्वासाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

ओबीसी समाजातील अनेक नागरिकांना जात प्रमाणपत्र, जात वैधता, शैक्षणिक व रोजगार आरक्षण, शिष्यवृत्ती, विविध महामंडळांच्या योजना, शासनाच्या कल्याणकारी योजना तसेच महसूल, पंचायत, सामाजिक न्याय व इतर शासकीय विभागांशी संबंधित कामांसाठी वारंवार कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. योग्य मार्गदर्शनाअभावी अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. अशा नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन, संबंधित विभागांशी समन्वय आणि पाठपुरावा करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या तक्रारी, निवेदने आणि विविध योजनांशी संबंधित अडचणींची नोंद करून त्यावर संबंधित विभागांमार्फत कार्यवाहीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करतील.

याबाबत ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अनिल मारुती लोहार म्हणाले, "ओबीसी समाजाला त्यांच्या संविधानिक हक्कांबाबत जागरूक करणे, शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविणे हीच खरी लोकसेवा आहे. प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नाचे गांभीर्याने ऐकून त्याच्या निवारणासाठी प्रभावी पाठपुरावा केला जाईल. समाजहित आणि लोकहित हेच आमचे ध्येय असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यासाठी कटिबद्ध आहे."

ओबीसी समाजातील तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय कामकाजाशी संबंधित अडचणी, आरक्षण विषयक प्रश्न, तक्रारी, सूचना व विविध योजनांबाबतच्या समस्या घेऊन दर सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत राष्ट्रवादी भवन, सातारा येथे उपस्थित राहून या जनहिताच्या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अनिल मारुती लोहार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments