आंदोलकांची प्रकृती खालावली,
मागण्या मान्य होईपर्यंत
माघार नाही : रमेश उबाळे
रिपब्लिकन सेनेच्या उपोषणाचा पाचवा दिवस
संतोष शिराळे, सातारा |
सातारा नगर परिषदेच्या सन 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षांतील विविध खर्च, उत्पन्न, निविदा व प्रशासनिक कामकाजाची सविस्तर माहिती जाहीर करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत असून, मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली.
उपोषणस्थळी कार्यकर्त्यांनी हलगी नाद आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. "प्रशासन बहिरे झाले आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत," असा आरोप रमेश उबाळे यांनी केला.
उबाळे यांनी नगर परिषदेच्या विविध विभागांतील खर्च, घनकचरा प्रकल्पाचा खर्च व उत्पन्न, खत विक्रीचा तपशील, कर्मचारी व कंत्राटी कामगारांची संख्या, वेतन, ठेकेदार, निविदा प्रक्रिया, घंटागाड्यांची माहिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मिळालेला निधी, तसेच शहरातील काँक्रीट रस्ते, गटारे, पथदिवे आणि देखभाल-दुरुस्तीवरील खर्चाची बिलांसह माहिती देण्याची मागणी केली आहे. याशिवाय, 108 रुग्णवाहिका सेवा वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, संबंधित टेंडर रद्द करण्याची तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.
"हे केवळ माझे आंदोलन नसून जनतेच्या पैशाचा हिशेब मागण्याची लढाई आहे. माहिती मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील," असे उबाळे यांनी सांगितले.
दरम्यान, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याने प्रशासनाने तातडीने संवाद साधून तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांसह विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून मात्र याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!